Maharastra Lockdown : राज्य शासनावर मुंबईतील डब्बेवाले नाराज

राज्यातील कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. (Coronavirus in Maharashtra)   

Updated: Apr 14, 2021, 02:37 PM IST
Maharastra Lockdown : राज्य शासनावर मुंबईतील डब्बेवाले नाराज title=
संग्रहित फोटो

मुंबई : राज्यातील कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. (Coronavirus in Maharashtra)  राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधताना कडक संचारबंदीची घोषणा केली. त्यामुळे 15 दिवस राज्यात कडक अमलबजावणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांनी गरिब वर्गातील लोकांना तसेच काही घटकांना मदतीचा हात देऊ केला आहे. मोफत शिवभोजन, तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळही देणार आहेत. तसेच रिक्षा चालक आणि मजूर कामगार यांना आर्थिक मदतीचा हात देण्याची घोषणा केली. मात्र, मुंबईतील डब्बेवाले (Mumbai Dabbawala,) यांच्यासाठी राज्य शासनाने आर्थिक मदतीची घोषणा केलेली नाही. यामुळे मुंबईत डब्बेवाले नाराज झाले आहेत. त्यांनी आपली स्पष्ट नाराजी बोलून दाखवली आहे.

मुंबईतील डब्बेवाल्यांचे हातावर पोट आहे. अनेक आस्थापना आणि खासगी कार्यालये बंदचे आदेश आहेत. तर काही कार्यालयात 50 टक्के उपस्थितीचे निर्देश आहेत. त्यामुळे आम्ही कोणाला डब्बे द्यायचे, लॉकडाऊनमुळे अनेक डब्बे बंद आहेत. हाताला काम नाही. मग खायचे काय, असा सवाल डब्बेवाल्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकार लॉकडाऊन लावताना आमच्यासाठी काहीतरी तरतूद करेल अशी आशा होती. परंतु निराशाच पदरी पडली आहे. त्यामुळे सरकारने याचा विचार करावा, अशी डब्बेवाल्यांची मागणी आहे. 

दरम्यान, सरकारने आम्हाला विचारात घेतलेले नाही. रिक्षा चालकांना पॅकेज मग आम्ही काय पाप केलं आहे, असा प्रश्न टॅक्सी संघटनांनी उपस्थित करत  मुंबईतील टॅक्सी संघटना आणि चालकांनी संताप व्यक्त केला आहे.

व्यापारीही नाराज

राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लागू केले आहेत. सरकारने कडक लॉकडाऊन जाहीर न करता पार्शल लॉकडाऊन जाहीर केला. यामध्ये व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी म्हटले आहे.  ठराविक व्यापार सुरु ठेवायचा आणि ठराविक व्यापार बंद यामुळे मूळ उद्देश सफल होईल का याबद्दल आमच्या मनात शंका असे ते म्हणाले.

सरकारने लॉकडाऊन जाहीर करताना व्यापाऱ्यांच्या तोंडाला विचारात घेतले नाही. छोट्या व्यापाऱ्यासाठी सरकार काहीं ना काही पॅकेज जाहीर करतील अशी अपेक्षा होती, पण सरकारे निराशा केल्याचे ललित गांधी म्हणाले.