मांजरीच्या मागे लागतो म्हणून मालकिणीने श्वानावर ओतलं अ‍ॅसिड; घटना CCTVत कैद

Mumbai Crime : मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महिलेने केलेल्या अ‍ॅसिड हल्ल्यामुळे कुत्र्याला एक डोळा गमवावा लागला आहे. मालवणी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 18, 2023, 02:39 PM IST
मांजरीच्या मागे लागतो म्हणून मालकिणीने श्वानावर ओतलं अ‍ॅसिड; घटना CCTVत कैद title=

Mumbai Crime : आतापर्यंत एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड हल्ल्याच्या (Acid Attack) घटना घडल्याचे तुम्ही ऐकलं असेल. पण मांजरीच्या मागे लागतो म्हणून एका महिलेने कुत्र्याच्या अंगावर अ‍ॅसिड ओतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या (Mumbai News) मालवणीमध्ये ही खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे या प्रकरणी महिलेवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून मालवणी पोलीस (Malvani Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

बुधवारी रात्री उशिरा मुंबई पश्चिम उपनगरातील मालाडच्या मालवणीमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मालवणीमधील सामनानगर परिसरातील स्वप्नपूर्ती या इमारतीमध्ये महिलेने पाळीव कुत्र्यावर हा जीवघेणा हल्ला केला आहे. सबिस्ता सुहेल अन्सारी (35) असं या महिलेचं नाव आहे. सबिस्ता सुहेल अन्सारीने कुत्र्यावर अॅसिड हल्ला केल्याचा प्रकार इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

सबिस्ता सुहेल अन्सारी यांनी त्यांच्या घरात एक मांजर पाळली आहे. इमारतीमधील एक पाळीव कुत्रा अन्सारी यांच्या मांजरीसोबत खेळतो. तिच्या मागे लागतो. याचाच अन्सारी यांना राग होता. रागाच्या भरात अन्सारी यांनी बुधवारी रात्री पाळीव कुत्र्यावर अॅसिड हल्ला केला आहे. या घटनेत कुत्रा जबर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या हल्ल्यात कुत्र्यांला गंभीर दुखापत झाली असून त्याचा एक डोळा निकामी झाला आहे. तर अ‍ॅसिडमुळे शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. टीव्ही अभिनेत्री जया भट्टाचार्य यांना ही बाब समजताच त्यांनी तात्काळ जखमी श्वानाला थँक यू अर्थ या एनजीओमध्ये नेलं होतं. एनीओद्वारे चावण्यात येणाऱ्या वैद्यकीय केंद्रात जखमी श्वानाला दाखल केलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

दरम्यान, सोसायटीच्या अध्यक्षांनी अॅसिड हल्ला करणाऱ्या सबिस्ता सुहेल अन्सारी यांच्याविरोधात मालवणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर मालवणी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 429, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे कलम 11 (1), आणि  महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 119 अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

 

नेमकं काय घडलं?

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, "जखमी कुत्रा गेल्या पाच वर्षांपासून इमारतीमध्ये आहे. त्यामुळे इमारतीमधील रहिवासी त्याला खायला देतात. हल्ला करणारी महिला देखील अनेक वर्षांपासून याच इमारतीत राहते आणि परिसरातली मांजरींना खाऊ घालते. हा कुत्रा महिलेच्या मांजरांसोबत खेळताना दिसला किंवा पाठलाग करताना दिसला तर ती त्याला हुसकावून लावत असे. रात्री साडेबाराच्या सुमारास इमारतीच्या खाली कुत्र्याच्या भुंकण्याचा आणि मोठ्याने विव्हळताना आवाज आला होता. त्यानंतर संध्याकाळी समजलं की, कोणीतरी त्या कुत्र्यावर हल्ला केला असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अॅसिड हल्ला झाल्याचं समोर आलं. सीसीटीव्ही फूटेज तपासले असता कोणी नसल्याचं पाहून सबिस्ता अन्सारीने बॉटलमधून अॅसिड कुत्र्यावर अॅसिड फेकलं."