पत्नीसोबत नको ते केलं, चूक लक्षात आली अन्... स्वतःला पेटवून घेत पतीने संपवलं जीवन

Mumbai Crime : धारावी परिसरात बुधवारी रात्री एका तरुणाने आपल्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केल्यानंतर आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, या दाम्पत्यात किरकोळ वाद झाला होता.

आकाश नेटके | Updated: May 5, 2023, 10:34 AM IST
पत्नीसोबत नको ते केलं, चूक लक्षात आली अन्... स्वतःला पेटवून घेत पतीने संपवलं जीवन title=

Mumbai Crime : मुंबईच्या धारावीत (Dharavi Crime) एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एका २५ वर्षीय तरुणाने पत्नीला रॉकेल टाकून पेटवून दिले. त्यानंतर आरोपीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धारावी पोलिसांनी (Dharavi Police) दिलेल्या माहितीनुसार, नाईकनगर, धारावी येथील रहिवासी आरोपी अनिल हिरालाल धुरिया याचा बुधवारी त्याची पत्नी प्रिया (26) हिच्याशी जोरदार वाद झाला होता. रागाच्या भरात अनिलने पत्नी आणि स्वतःवर रॉकेल टाकून पेटवून घेतले होते. घटनेची माहिती मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले होते. मात्र दोघांचाही मृत्यू झाला.

धुरिया पती-पत्नी धारावीत एकत्र राहत होते. आरोपी पती अनिल धुरिया याला दारूचे व्यसन होते, अशी माहिती समोर आली आहे. दारु पिण्यावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडणे देखील व्हायची. बुधवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अनिल दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने प्रियासोबत भांडण सुरु केले. दोघांमधला वाद इतका वाढला की रागाच्या भरात अनिलने प्रियाच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. त्यानंतर स्वतःवरही रॉकेल टाकले आणि पेटवून घेतले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

गुरुवारी उपचारादरम्यान अनिलचा मृत्यू झाला. प्रियावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान प्रियाचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी गुरुवारी सांगितले.

"दादर येथील एका दुकानात मोबाईल दुरुस्तीचे काम करणारा अनिल धुरिया बुधवारी दारूच्या नशेत घरी आला होता. त्याचा आणि त्याची पत्नी प्रिया यांच्यात वाद झाला, त्यानंतर त्याने घरात ठेवलेले रॉकेल आणून तिच्या अंगावर ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा प्रियाने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिला पेटवून दिले. काही वेळातच त्याला आपली चूक लक्षात आली आणि त्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. शेजारच्यांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि दोघांनाही सायन रुग्णालयात दाखल केले. या घटनेत महिला 100 टक्के भाजली होती आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तर आरोपी पतीदेखील 90 टक्के भाजला होता," असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, पोलिसांनी धुरियाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र उपचारादरम्यान प्रियाचा मृत्यू झाल्याने पोलीस आता या प्रकरणात कलम 302 (हत्या) देखील जोडणार आहेत.