अमर काणे, झी मीडिया, नागपूर : काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकांचा (Maharashtra Vidhansabha Election 2024) बिगूल वाजणार आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केलीय. महायुतीत (Mahayuti) जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे.. लोकसभेत जागावाटपावरून उशीर झाल्यानं महायुतीला चांगलाचं फटका बसला होता. त्यामुळे विधानसभेला खबरदारी म्हणून महायुतीचे उमेदवार ठरणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात
महायुतीत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीत 80 टक्के जागावाटप निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे. महायुतीत भाजप सर्वाधिक जागा लढवणार असून 2019 प्रमाणेच जवळपास सुमारे दीडशे जागा लढविण्याचा भाजपचा (BJP) आग्रह आहे. घटकपक्ष मिळून 160 जागांवर लढण्याची भाजपची तयारी असल्याची सूत्रांची माहिती आहे.
80 टक्के जागांवर एकमत झाल्यानं उर्वरित जागांवर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीतील नेते प्रयत्नशील आहेत. पुढील आठवड्यात गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान महायुतीतील जागावाटपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यास महायुती बरीच रेंगाळली होती. त्याचा फटकाही महायुतीला बसला होता. आता 10 ते 20 नोव्हेंबरदरम्यान विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीची भूमिका घेत महायुतीत जागावाटपांचा तिढा लवकर सोडून उमेदवार जाहीर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विधानसभेसाठी भाजपचं मिशन'125'?
भाजपने केलेल्या सर्व्हेत 50 जागांवर उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. उर्वरित 75 जागांसाठी विशेष प्रयत्न करणार. 75 जागांची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर सोपवणार. 'एक नेता, एक जिल्हा' धोरणाअंतर्गत प्रत्येक नेत्याला एका जिल्ह्याची जबाबदारी देणार आणि त्यानुसार निवडणूक रणनीती ठरणार. ग्राउंड झिरोवर काम करत रिझल्ट मिळवणार. भाजप पदाधिकारी आणि नेत्यांनी अमित शाहांच्या बैठकीत विधानसभेला भाजपनं 160 जागा लढल्या पाहिजेत अशी मागणी केलीय.. 288 जागांपैकी भाजपनं 160 जागा लढवल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाश शिंदेच्या शिवसेनेला प्रत्येकी 64 जागांवर निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे.