Tirupati Laddoos : तिरुमलाच्या पवित्र लाडू प्रसादामध्ये तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जाते असा धक्कादायक आरोप करुन चंद्राबाबू नायडू यांनी खळबळ उडवून दिली आहे. जगन मोहन यांच्या वायएसआर काँग्रेस सरकारवर (YSRCP government) तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप नायडूंनी केलाय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने या लाडूंची चाचणी केली. यात लाडू भेसळयुक्त असल्याचं सांगण्यात आलं आहे. लाडूत चरबी आणि माशांच्या तेलासह अनेक दूषित घटक आढळले असल्याचा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.
चंद्राबाबू नायडूंचे खळबळजनक आरोप
गेल्या 5 वर्षांत, YSR काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाचे पावित्र्य कलंकित केलं
तिरुपतीच्या लाडू प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरत होते
तिरुपतीचे लाडू हे निकृष्ट घटकांचा वापर करून तयार करण्यात येत होते
लाडू तयार करतांना शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होती
आता आमच्या सरकारच्या काळात लाडू बनवण्यासाठी शुद्ध तुपाचा वापर करण्यात येत आहे
राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत धक्कादायक खुलासा
राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने आपल्या अहवालात तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे संचालित तिरुपती इथल्या श्री व्यंकटेश्वर मंदिराचे लाडू बनवण्यासाठी चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर करण्यात आल्याचं म्हटलं हे. . तिरुपती मंदिरातील लाडू आणि अन्नदानमचे नमुने तपासल्यानंतर बोर्डाच्या अहवालात हा मोठा खुलासा झाला आहे. देवाला अर्पण केल्यानंतर हे लाडू प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटले जातात. त्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.
लाडूवरुन आंध्रप्रदेशमध्ये राजकारण तापलं
तिरुपती म्हणजे करोडो हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्र. भगवान व्यंकटेश्वर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बालाजीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो लोकं येतात.. महाराष्ट्रातल्या भाविकांची संख्या तर प्रचंड असते.. भाविक बालाजीची पूजा करतात आणि प्रसाद म्हणून लाडू घेतात.. मात्र आता या लाडूच्या प्रसादावरुन आंध्र प्रदेशचं राजकारण चांगलंच तापलं आहे. वायएसआर काँग्रेस तसंच तिरुमला देवस्थानम ट्रस्टच्या माजी सदस्यांनीही चंद्राबाबू नायडूंचे आरोप फेटाळून लावले आहेत.
दररोज लाखो भाविक तिरुपतीच्या दर्शनाला येतात. त्यानंतर प्रसाद म्हणून लाडू घरी घेऊन जातात. प्रसादाचे लाडू देण्यासाठी देवस्थानमध्ये अनेक काऊंटर्स तयार करण्यात आले आहेत. लाडू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दीही असते. हे लाडू अनेक महिने टीकतात, त्यामुळे भाविक इतरांनाही प्रसाद म्हणून वाटण्यासाठी लाडू विकत घेतात. त्यामुळेच तिरुपतीच्या लाडूत तुपाऐवजी चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर होत असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे.