आता मुंबई महानगरपालिकेतही पाच दिवसांचा आठवडा

 या दोन सुट्ट्यांसाठी कामाचे वाढवलेले तास वादाचे कारण ठरण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 5, 2020, 07:45 AM IST
आता मुंबई महानगरपालिकेतही पाच दिवसांचा आठवडा title=

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनाही आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून पालिकेच्या कामगार विभागाकडून यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध जारी करण्यात आले आहे. मात्र, यावर अजून पालिका आयुक्तांची सही बाकी आहे. या परिपत्रकानुसार अत्यावश्यक सेवा वगळून कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची सुट्टी मिळेल.

मात्र, या दोन सुट्ट्यांसाठी कामाचे वाढवलेले तास वादाचे कारण ठरण्याची शक्यता आहे. महापालिका कर्मचारी संघटनेने पाच दिवसांच्या आठवड्यासाठी महापालिका प्रशासनाकडून लागू करण्यात आलेल्या नियमावलीला विरोध केला आहे. या नियमावलीनुसार महापालिका कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा हवा असेल तर दररोज दीड तास जास्त काम करावे लागले. तसेच सात नैमित्तिक सुट्ट्यांवर पाणी सोडावे लागणार आहे. 

परंतु, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या आठवड्यासाठी केवळ ४५ मिनिटे जास्त काम करावे लागत असेल तर महापालिका कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय का, असा सवाल कर्मचारी संघटनेकडून उपस्थित करण्यात आला आहे. पालिकेचे कर्मचारी लांबून येतात. त्यामुळे जादा कामाची वेळ अन्यायकारक आहे, असे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. 

'या' कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू नसणार, जाणून घ्या

तत्पूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी २९ फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू झाला होता. त्यानुसार कर्मचाऱ्यांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत काम करावे लागत आहे. तर सरकारी कार्यालयातील शिपायांसाठी कामाची वेळ सकाळी ९.३० ते सायांकाळी ६.३० असेल. दुपारी १.०० ते २.०० या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे.