अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : दहावीत असतानाच वडिलांच्या निधनानं दुःखाचा डोंगर कोसळला. डोक्यावरचं छत्रच हिरावलं. आर्थिक परिस्थिती खालावली. अशा मानसिक दबावातही त्याने जिद्दीनं अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९२.४० टक्के गुण प्राप्त केले. विक्रोळीच्या बाबू कदम या विद्यार्थ्याची ही यशोगाथा.
विक्रोळी पार्कसाईट परिसरातील रायगड विभागात एका भाड्याच्या खोलीत राहणारा हा आहे छोटा बाबू कदम. धाकटा भाऊ विशाल आणि आई सविता असं याचं त्रिकोणी कुटुंब. विशाल दहावीत असतानाच वडील गणेश कदम यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. वडील खासगी सुरक्षा रक्षक असल्याने जेमतेम पगारावरच उदरनिर्वाह चालायचा. वडिलांच्या निधनानंतर संसाराचा गाडा हाकण्याची जबाबदारी आईवर पडली. परिस्थितीचे चटके सोसत बाबूने अभ्यास नेटाने सुरू ठेवला. शिकलो तरच उत्तम संधी प्राप्त होतील यावर श्रद्धा असलेल्या बाबूने मन लावून अभ्यास करत दहावीच्या परीक्षेत ९२.४० टक्के गुण प्राप्त केले. बाबूच्या जिद्दीची कहाणी सांगताना आईचे डोळे पाणावतात.
बाबूला आर्किटेक्ट व्हायचंय. त्यासाठी त्याला उच्च शिक्षण घ्यायचंय. उच्च शिक्षणाचा खर्च कसा उचलायचा याची आईसमोर चिंता आहे. बाबू आपल्या यशाचं श्रेय शिक्षकांनाही देतो. बाबू स्वतःचा अभ्यास सांभाळून धाकट्या भावाचा अभ्यासही घ्यायचा.
बाबू लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी असल्याने विक्रोळीच्या विवेक विद्यालयातल्या शिक्षकांचा लाडका. आर्थिक परिस्थिती त्याच्या शिक्षणाच्या आड येऊ नये यासाठी शाळेनेही वेळोवेळी शालेय साहित्य आणि शाळेच्या फीसाठी सवलती दिल्या. बाबूने केवळ चांगले गुण मिळवले नाहीत, तर तो शाळेत पहिलाही आला.
गुणवत्तेच्या जोरावर बाबूने सर्व अडथळे दूर सारत यश संपादन केलंय. त्याला गरूड झेप घेण्यासाठी गरज आहे ती आर्थिक पाठबळाची... त्याच्या पुढील वाटचालीसाठी झी २४ तासच्या शुभेच्छा.