अजितदादांचा दरारा कायम! माध्यमांच्या या प्रश्नावर भडकले

राज्याच्या राजकारणात मागच्या काही दिवसांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती अजित पवारांची.

Updated: Nov 27, 2019, 09:07 AM IST
अजितदादांचा दरारा कायम! माध्यमांच्या या प्रश्नावर भडकले title=

मुंबई : राज्याच्या राजकारणात मागच्या काही दिवसांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती अजित पवारांची. देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देत अजित पवारांनी खळबळ माजवून दिली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, पण तीन दिवसांमध्येच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कोसळलं.

३ दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या अजित पवारांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 'मी राष्ट्रवादीमध्येच होतो, राष्ट्रवादीमध्येच आहे आणि पुढेही राष्ट्रवादीमध्येच राहणार आहे. ते बंड नव्हतं, मी राष्ट्रवादीचाच नेता होतो. राष्ट्रवादीने माझी हकालपट्टी केली का? आपण कुठे वाचलं का?' असा संतप्त सवाल अजित पवारांनी विचारला.

आमदारकीची शपथ घेण्यासाठी अजित पवार हे विधानसभेमध्ये आले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेत दाखल होत असताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांची गळाभेट घेतली. तर अजित पवार हे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सक्रीय होतील, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. 

महाविकासआघाडीने उद्धव ठाकरेंची नेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. २८ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.