Air India Job Vacancy : बेरोजगारी ही जगासाठी गंभीर समस्या बनली आहे. भारतातही अनेक दशकांपासून बेरोजगारीचा (Unemployment) मुद्दा कळीचा ठरतोय. याचं ज्वलंत उदाहरण मुंबईत पाहायल मिळालं. एअर इंडियाच्या (Air India) 600 जागांसाठी भरती काढण्यात आली. पण 600 जागांसाठी मुलाखत द्यायला तब्बल 25 हजार तरुणांची गर्दी झाली. या गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. एअर इंडियातर्फे एअरपोर्ट लोडर पदासाठी (Airport Loader) भरती ठेवण्यात आली होती. नोकरीची जहीरात देण्यात आली. पण 600 जागांसाठी 25 हजाराहून अधिक तरुणांची गर्दी झाल्याने मुंबई विमानतळाजवळ एकच तारांबळ उडाली. एअर इंडिया कर्मचाऱ्यांना गर्दी सांभाळताना नाकेनऊ आले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन आता राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. मुंबई विमानतळाजवळची ही दृष्य देशातील बेरोजगारीची भीषणता दाखवण्यासाठी पुरेशी असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत मुंबई विमानतळानजीक असलेल्या जागेत तरुणांची तुफान गर्दी दिसतेय. आपला अर्ज काऊंटरपर्यंत पोहोचवण्यासाठी हजारोंच्या संख्यने आलेले तरुण एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत.
लोडरच्या जॉबसाठी तरुणांची गर्दी
एअर इंडियात लोडर पदासाठी ही भरती करण्यात येत आहे. लोडरच्या नोकरीत विमानातून सामान उतरवण्याचं आणि चढवण्याचं काम असतं. प्रत्येक विमानातील सामान, कार्गो आणि इतर सामान उतरवण्यासाठी किंवा चढवण्यासाठी पाच ते सहा लोडर असतात. लोडरचा पगार 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत असतो. ओव्हरटाईम केल्यास पगार 30 हजारांपर्यंत जातो. लोडर पदासाठी शिक्षणाची अट दहावी पास असली तर उमेदवार शरीराने तंदरुस्त असायला हवा अशी अट असते.
After the Gujarat hotel job where thousands kept coming ,
It was Maharashtra's turn
Mumbai's Kalina, look at the number of job seekers as Air India Airport Services Ltd announced walk-in interviews.
pic.twitter.com/mbSLQ50TJS— Jude David (@judedavid21) July 17, 2024
भरुचमध्येही तरुणांची गर्दी
काही दिवसांपूर्वी गुजरातच्या भरुचमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एका खासगी कंपनीत 500 जागांसाठी भरती करण्यात येणार होती. यासाठी एका हॉटेलमध्ये मुलाखतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला. पण मुलाखत देण्यासाठी तरुणांची हजारोंनी गर्दी झाली. कंपनीला इतकी गर्दी होईल याची अपेक्षा नव्हती. त्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली आणि धक्काबुक्की झाली. अखर गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आलं.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल झाला होता. तरुणांची गर्दी इतकी वाढली होती की हॉटेलची रेलिंगही तुटली होती. शिवाय हॉटेलच्या लॉबित उभ्या असलेल्या वाहनांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं.