'मुंबईतील परीक्षाकेंद्राबाहेर 3 कोटींची...'; पूजा खेडकरबद्दल Maha अकादमीच्या संस्थापकाचा धक्कादायक खुलासा

Pooja Khedkar Mother 3 Cr Worth Toyota Land Cruiser Car: पूजा खेडकर यांच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात चौकशी सुरु झालेली असतानाच ही पोस्ट समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 17, 2024, 01:34 PM IST
'मुंबईतील परीक्षाकेंद्राबाहेर 3 कोटींची...'; पूजा खेडकरबद्दल Maha अकादमीच्या संस्थापकाचा धक्कादायक खुलासा title=
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Pooja Khedkar Mother 3 Cr Worth Toyota Land Cruiser Car: वादात सापडलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर सुद्धा एका जुन्या व्हायरल व्हिडीओमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच आता महाअकादमी तसेच युपीएससी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षकक हर्षल पाटील यांनी एक मोठा खुलासा आपल्या सोशल मीडिया अकाऊटंवरुन केला आहे. पाटील यांनी मनोरमा खेडकर यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी 3 कोटींची कार अनेकदा त्यांच्या मुंबईतील परीक्षाकेंद्राबाहेर पाहिल्याची आठवण सांगितली आहे. आपण रोज जेव्हा युपीएससीच्या परीक्षेसाठी केंद्रात जायचो तेव्हा प्रवेशद्वाराजवळ एक 3 कोटींची आलिशान गाडी उभी असल्याचं दिसायचं. ती गाडी कोणाची आहे याचं उत्तर मिळालं, असं म्हणत पाटील यांनी व्हायरल व्हिडीओमधील स्क्रीन शॉट शेअर केला आहे.

नेमकं काय आहे पोस्टमध्ये?

मुंबईमधील शीव (सायन) येथील गुरुदत्त मित्तल स्कूल येथील युपीएससीच्या केंद्रावर ही गाडी अनेकदा उभी दिसायची असं पाटील यांनी म्हटलं असून नेमकं हे वर्ष कधीचं होतं याचा उल्लेख टाळला आहे. पाटील यांनी खेडकर आणि त्या कारचा थेट संबंध असल्याचा दावा कॅप्शनमधून केला नसला तरी सोबत जोडलेला फोटो हा पुजा खेडकर यांच्या आईच्या व्हायरल व्हिडीओमधील आहे. ज्यामध्ये मनोरमा खेडकर या काळ्या रंगाच्या कारजवळ उभ्या असल्याचं दिसत आहे. ही तीच कार असल्याचं पाटील यांना या फोटोमधून सूचित करायचं असल्याचं स्पष्ट होत आहे. फोटोमध्ये मनोरमा खेडकर यांच्यामागे काळ्या रंगाची टोयोटा लँड क्रूझर उभी असल्याचं दिसत आहे.

ही कार खेडकर कुटुंबाची आहे किंवा त्याची मालकी खेडकर कुटुंबाकडे आहे याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पाटील यांनी पुजा खेडकर प्रकरण चर्चेत असताना केवळ त्यांच्या विद्यार्थीदशेतील एक आठवण शेअर केली आहे. सरकारी नोकरीच्या परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर एवढी आलीशान कार पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याचंही पाटील यांनी नमूद केलं आहे.

पोस्टमधील मजकूर...

"मी युपीएससीमध्ये माझा शेवटचा अटेम्प्ट मुंबईतील केंद्रातून दिला. मी मुंबईतील सायन येथील गुरुदत्त मित्तल स्कूलमधून परीक्षा दिली. मला आठवतंय परीक्षाकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळच रोज काळ्या रंगाची टोयोटा लॅण्ड क्रूझर उभी असायची. आम्हाला विचार करुन आश्चर्य वाटायचं की 3 कोटींची कार असलेली आणि सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणारी ही व्यक्ती कोण आहे. त्याच केंद्रावर माझ्याबरोबर परीक्षा दिलेल्या एका मित्राने मला याची आठवण करुन दिली. एक महिला शेतकऱ्याला बंदूक दाखवत धकमावत असल्याचा व्हिडीओ पाहिल्यावर त्या व्हिडीओत मागे ही लॅण्ड क्रूझर दिल्याने त्याला ती गाडी आठवली. आता आम्हाला कदाचित आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं," अशी कॅप्शन पाटील यांनी फोटो दिली आहे.

दरम्यान, दुसरीकडे 16 जुलै रोजी आपल्या खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावल्याने वादात सापडलेल्या वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबविण्याचे आदेश वाशिम प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच 17 जुलै रोजी नाशिकमधील लाललुचपत प्रतिबंध खात्याकडून पाच तासांहून अधिक काळापासून पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरु आहे.