मुंबईमध्ये २० टक्के पाणीकपात, ढिसाळ नियोजनाची भाजपची टीका

मुंबई महापालिका क्षेत्रात ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

Updated: Jul 31, 2020, 07:46 PM IST
मुंबईमध्ये २० टक्के पाणीकपात, ढिसाळ नियोजनाची भाजपची टीका title=

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. कमी पावसामुळे पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. दरम्यान महापालिकेच्या या निर्णयावरुन भाजपने टीका केली आहे. मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी कपात करण्याची वेळ आल्याचं भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले आहेत. 

कोविडमुळे हात धुण्यासाठी अधिक पाणी लागत असताना आणि आता सणासुदीच्या काळात पाणीकपात केल्यामुळे नागरिकांना त्रास होणार आहे. तसंच लॉकडाऊन काळात कार्यालयं बंद होती, तेव्हा पाण्याचा वापर कमी झाला, तरीही पाणीकपात करावी लागत आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेनं पाण्याचा हिशोब जनतेसमोर ठेवून पाणीवाटपाचं नियोजन करावं, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे. 

पाणीकपात का?

दरम्यान मुंबई महापालिकेने पाणीकपातीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. जून आणि जुलै महिन्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला, त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त ३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा जुलै २०१९ मध्‍ये ८५.६८ टक्‍के व जुलै २०१८ मध्‍ये ८३.३० टक्‍के होता.

हीच परिस्थिती कायम राहिल्यास पावसाळ्यानंतरही महापालिकेकडे पुरेसा जलसाठा उपलब्ध होऊ शकणार नाही. मुंबईचा पाणीपुरवठा ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरळीत चालू ठेवण्यासाठी पाणीपुरवठ्यात दिनांक ५ ऑगस्‍ट २०२० पासून २० टक्‍के पाणीकपात करण्‍यात येणार आहे, असं मुंबई महापालिकेने सांगितंल आहे. 

ही पाणीकपात बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जाणा-या ठाणे, भिवंडी महानगरपालिका तसंच इतर गावांनासुद्धा लागू राहील. तरी सर्व नागरिकांनी या कालावधीत पाण्‍याचा अपव्यय करू नये, असं आवाहन महापालिकेने केलं आहे.