Budget 2024 : बजेटच्या तोंडावर मुकेश अंबानींना सुगीचे दिवस, 'या' कंपनीने रचला विक्रम; शेअर्स तुफान तेजीत!

Reliance Industries : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या समभागांनी 7 टक्क्यांच्या वाढीसह 2897 चा उच्चांक गाठला आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 19.60 लाख कोटी रुपयांच्या आजीवन उच्चांकावर पोहोचल्याचं पहायला मिळतंय.

सौरभ तळेकर | Updated: Jan 29, 2024, 04:15 PM IST
Budget 2024 : बजेटच्या तोंडावर मुकेश अंबानींना सुगीचे दिवस, 'या' कंपनीने रचला विक्रम; शेअर्स तुफान तेजीत! title=
Reliance Industries Shares Historic Rise Market Cap Crosses Rs 19 Lakh Crore

Reliance Industries Shares Historic Rise : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण येत्या 1 फेब्रुवारी रोजी सलग सहाव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करणार आहेत. अशातच आता बजेटमधून लोकांना काय मिळणार? असा सवाल विचारला जातोय. बजेटचा थेट परिणाम शेअर बाजारात पहायला मिळतो. अशातच आता बजेट तोंडावर असताना मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला सुगीचे दिवस आल्याचं पहायला मिळतंय. सोमवारी बाजार उघडताच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठे बदल झाल्याचं पहायला मिळालं.

सोमवारी बाजार उघडल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 2,729 रुपयांवर उघडला. यानंतर शेअरने 2800 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने 19 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. असा रेकॉर्ड करणारी ही देशातील पहिली कंपनी आहे. आजच्या या विक्रमामुळे आज रिलायन्सने 1 लाख कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती देखील समोर येतीये. 

रिलायन्सच्या समभागांनी 2015 पासून दरवर्षी सकारात्मक परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर 9 टक्क्यांनी वाढलेत. तीन महिन्यांत 23 टक्के आणि एका वर्षात 20 टक्के वाढले आहेत. या शेअरने तीन वर्षांत 50 टक्के परतावा दिलाय. तर कंपनीने 2023 मध्ये देखील गुंतवणूकदारांना 11.5% इतका मोठा परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाल्याचं पहायला मिळतंय. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा एकूण नफा 5208 कोटी रुपये होता. कंपनीचे निव्वळ उत्पन्न देखील दुसऱ्या तिमाहीत 24750 कोटी रुपयांवरून 25368 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

दरम्यान, मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्यानंतर या यादीत टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, एलआयसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी आणि एसबीआय या कंपन्यांचा समावेश आहे.