MP Sanjay Raut On Mohan Bhagwat Superman Comment: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'काहींना सुपरमॅन व्हायचं असतं, काहींना देव व्हायचं असतं' असं म्हणत जाहीर भाषणामधून सूचक विधान केल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुनावलं आहे. सर्व सामान्य व्यक्तीच सुपरमॅन असल्याचं सांगताना राऊत यांनी, 'कॉमन मॅनच सुपरमॅन असून याच सुपरमॅनने मोदींच्या पायाखालची बहुमताची सतरंजी खेचली आहे,' असं म्हटलं आहे.
"एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला विष्णूचा तेरावा अवतार समजते. एक व्यक्ती आहे देशात तिला असं वाटतं प्रभू श्रीराम यांचे बोट धरून मीच त्यांना अयोध्येच्या राम मंदिरात घेऊन गेलो. ते नसते तर अयोध्येत राम भगवान राम यांची प्राणप्रतिष्ठा झाली नसती. एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला सुपरमॅन समजते. एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला नॉन बायोलॉजिक पद्धतीने (अजैविक पद्धतीने) जन्माला आलो म्हणजे मला देवाने वरून जन्माला घातलं अशाप्रकारे लोकांना भयमित करत आहे. एक व्यक्ती आहे या देशात जी सांगते रशिया आणि युक्रेनचं युद्ध मीच थांबवलं पण ती व्यक्ती मणिपूर आणि जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार थांबू शकत नाही. मला असं वाटतं त्याच व्यक्तीविषयी मोहन भागवत बोलले आहेत," असा टोला राऊतांनी लगावला आहे.
"काही व्यक्ती स्वतःला सुपरमॅन समजतात. पण या सुपरमॅनच्या पायाखालची सतरंजी बहुमताची या सामान्य माणसाने खेचून घेतली. तो कॉमन मॅन आज सुपरमॅन आहे, असं आम्ही मानतो. तरी मोहन भागवत यांनी जे मत व्यक्त केलं त्याच्यावर देशाने चिंतन केलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाने हे केलं पाहिजे," असं राऊत म्हणाले. भाजपाच्या 400 पार नाऱ्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, "त्यांना खरं म्हणजे 400 पार चा आकडा गुंतल्यामुळे त्यांना 300 पॅसेंजरचा मृत्यू दिसला नाही," असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
"महाविकास आघाडी हा जरी चेहरा असला तरी आमच्या महाविकास आघाडीला या क्षणी जो चेहरा आहे तो अख्या महाराष्ट्राला माहिती आहे," असं सूचक विधान राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावर बोलताना केलं.
दिब्रूगढ येथे गुरुवारी झालेल्या रेल्वे अपघातासंदर्भात बोलताना राऊतांनी सर्वासामान्यांच्या ट्रेनसंदर्भात सरकार चिंता करत नसल्याची टीका केली. "आतापर्यंत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सूत्रं हातात घेतल्यापासून अपघातांची मालिका सुरूच आहे आणि आतापर्यंत सव्वा तीनशे प्रवासी अपघातात मरण पावले हा आकडा अत्यंत गंभीर आहे. बुलेट ट्रेन आणत आहात, मेट्रो ट्रेन आणत आहात, सुपरफास्ट ट्रेन आणत आहात पण सामान्य जनता ज्या लोकल ट्रेनमधून किंवा पॅसेंजरमधून प्रवास करते त्यांच्या सिग्नल यंत्रणा, रूळ यासंदर्भात सरकार काही करायला तयार नाही," अशी टीका राऊतांनी केली आहे. "तुम्ही बुलेट ट्रेनचा देखावा करत आहात. त्यासाठी प्रचंड पैसे खर्च करत आहात, पण सामान्य लोक लोकल ट्रेनमध्ये प्रवास करतात किंवा पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करतात त्यासंदर्भात सरकारने कोणत्याही योजना नाहीत. त्यांना आता रेल्वे सुद्धा श्रीमंतांसाठी चालवायची आहे," असं राऊत म्हणाले.