Mumbai Rain : मुंबईत मान्सूनची एन्ट्री, सोशल मीडियावर स्टेटसचा 'पाऊस'

मुंबईत अखेर पावसाची (Mumbai Rain) एन्ट्री झाली आहे. मुंबईत आज संध्याकाळी विविध भागात पावसाचं आगमन झालं.   

Updated: Jun 9, 2022, 11:07 PM IST
Mumbai Rain : मुंबईत मान्सूनची एन्ट्री, सोशल मीडियावर स्टेटसचा 'पाऊस' title=

मुंबई :  मुंबईत अखेर पावसाची (Mumbai Rain) एन्ट्री झाली आहे. मुंबईत आज संध्याकाळी विविध भागात पावसाचं आगमन झालं. पावसाची एन्ट्री झाल्याने सोशल मीडियावर स्टेटसचा पाऊस पाहायला मिळतोय. मुंबईकर आपल्या घराच्या खिडकीतून,ऑफिसमधून जिथे असतील तिथून पहिल्या पावसाचे फोटो शेअर करतायेत. त्यामुळे सोशल मीडियावर 'मुंबई रेन' हा हॅश्टॅग ट्रेंड झाला आहे.  पावसामुळे मुंबईकर सुखावले आहेत. (monsoon update 2022 heavy rainfall in various area of mumbai) 

दक्षिण मुंबईतील वरळी तर उपनगरातील वांद्रे, कुर्ला, असल्फा आणि साकीनाका भागात मोठा पाऊस झाला. उन्हाळ्यामुळे मुंबईकरांची लाहीलाही झाली होती. मात्र पावसामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला. पहिल्या पावसात मुंबईकरांनी तसेच बच्चेकंपनीने मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला. 

तर दुसऱ्या बाजूला मुंबईकरांची गैरसोयही झाली.  वीजपुरवठा खंडीत आणि रेल्वेसेवा विस्कळीत झाली. साकीनाका-घाटकोपर मार्गावर कायम वाहतूक कोंडी असते. मात्र पहिल्याच पावसात साकीनाका ते घाटकोपर रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली. तर ट्रान्स हार्बर मार्गावर सानपाडा येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे काहीवेळ मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला.