राज्यात दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता, मुंबईतही मध्यम पाऊस

 येत्या दोन दिवसांत राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Jul 23, 2020, 11:28 AM IST
राज्यात दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता, मुंबईतही मध्यम पाऊस title=
छाया सौजन्य । स्कायमेट

मुंबई :  येत्या दोन दिवसांत राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात राज्यात तुरळक ठिकाणी तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस मुंबईतही चांगला पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्यासह मुंबई आणि उपनगरामध्ये पाऊस गेल्या दोन दिवसांपासून गायब आहे. दरम्यान, पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर तापमानात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान २ ते ३ डिग्री सेल्सिअसपर्यंत सामान्यपेक्षा जास्त राहील आणि ते ३३ ते ३४ अंशांच्या श्रेणीमध्ये असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आता उत्तर कोकण, गोवा तसेच मुंबई आणि उपनगरांत हवामानात फारसा परिणाम दिसून येणार नाही. मात्र, अधूनमधून हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पावसामुळे मुंबईचे हवामान जवळपास कोरडे राहील. उत्तर भारतात काही ठिकाणी पावसाचा  जोर  राहिल. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवसांत पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि उपनगरामध्ये २६ किंवा २७ जुलैच्या सुमारास पावसाची शक्यता आहे. परंतु मुंबई व उपनगरामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता नसून पाऊस मध्यम स्वरुपाचा मर्यादित राहील.या काळात राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर भारतात चांगला पाऊस

२४ जुलैपासून उत्तर भारतातील भागात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी उत्तराखंड ते हिमाचल प्रदेश, दक्षिणी जम्मू-काश्मीर आणि पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील सखल भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात दिल्ली-एनसीआर, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राजस्थानात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता २५ जुलैपासून तीव्रतेत आणखी वाढेल. पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबमध्येही बर्‍याच भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पर्वतीय भागातील उत्तराखंड ते जम्मू-काश्मीरपर्यंत अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानात २७ जुलैपर्यंत पाऊस सुरु राहील, तर २७ जुलैपासून पश्चिम भारतातील इतर भागात पाऊस वाढेल आणि  पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणा ते पंजाबपर्यंत मुसळधार पाऊस होईल. हा पाऊस ३० जुलैपर्यंत असाच बरसत राहिल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.