'मनसेचा महाविराट मोर्चा पाहिल्यानंतर सरकार घाबरेल, पुन्हा 'तशी' हिंमत करणार नाही'

शिवसेनेला याचा साधा निषेधही करावासा वाटत नाही. याचा अर्थ काय समजायचा?

Updated: Jan 28, 2020, 10:04 AM IST
'मनसेचा महाविराट मोर्चा पाहिल्यानंतर सरकार घाबरेल, पुन्हा 'तशी' हिंमत करणार नाही' title=

मुंबई: गायक अदनान सामी याला पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेने सर्वप्रथम अदनान सामी याला पद्मश्री देण्यास विरोध दर्शविला होता. आगामी काळात हा विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मंगळवारी ट्विट करून तसे संकेत दिले.

या ट्विटमध्ये खोपकर यांनी म्हटले आहे की, येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईतील मनसेचा महाविराट मोर्चा बघितल्यानंतर पुढील १० हजार वर्षांत कोणतेही सरकार अदनान सामीसारख्या गायकाला पद्मश्री देण्याची हिंमत करणार नाही, असे खोपकर यांनी म्हटले. 

यावेळी अमेय खोपकर यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. गेल्या सहा वर्षात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करणे यांना जमले नाही. पण अज्ञान सामीला भारताचे नागरिकत्व देऊन त्याला लगेच पद्मश्री देण्याची यांना केवढी घाई. शिवसेनेला याचा साधा निषेधही करावासा वाटत नाही. याचा अर्थ काय समजायचा, असा सवाल अमेय खोपकर यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता शिवसेना या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अदनान सामी याला पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतर काँग्रेसकडूनही मोदी सरकारवर टीका करण्यात आली होती. सरकारची चमचेगिरी हा बहुमान मिळण्याचा नवा मापदंड झाल्याचे काँग्रेसने म्हटले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कार देण्यासाठी भारतीय मुस्लिम नव्हते का, असा सवाल उपस्थित केला होता.