शिंदे गटातल्या आमदाराची जीभ घसरली, संजय राऊत यांच्यावर पातळी सोडून टीका

संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत खळबळजनक आरोप

Updated: Jul 5, 2022, 05:38 PM IST
शिंदे गटातल्या आमदाराची जीभ घसरली, संजय राऊत यांच्यावर पातळी सोडून टीका title=

Maharashtra Politics : महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis) यांचं सरकार सत्तेवर आलं. शिवसेनेतील 40 आमदार शिंदे गटात सहभागी झाले. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष टोकाला गेलाय. दोन्ही गटाचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. 

यातच आता वादाची नवी ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. संजय राऊत बारा बापाचा नसेल तर राजीनामा दे असं आव्हान संजय गायकवाड यांनी दिलं आहे.  संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले होते, असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

सत्तांतराच्या नाट्यानंतर आमदार संजय गायकवाड बुलडाणा या आपल्या मतदारसंघात परतले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत बंडाची कहाणी सांगितली. 

राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्हाला निधी मिळू दिला नाही, उलट आमच्याच तक्रारी उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या, त्यामुळे सर्वच आमदार व्यथित होते. असं संजय गायकवाड यांनी सांगितलं. शिवेसेनेचं धनुष्यबाण लवकरच आम्हाला मिळणार असून येत्या दोन ते तीन महिन्यात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असंही संजय गायकवाड यांनी स्पष्ट  केलं.