देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यमंत्री सत्तारांची फिरकी

काय म्हणाले फडणवीस

Updated: Jan 5, 2022, 11:06 PM IST
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यमंत्री सत्तारांची फिरकी title=

मुंबई : रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच होईल आणि भाजप सेना युतीचा पूल केवळ नितीन गडकरीच बांधू शकतात या दोन विधानांमुळे चर्चेत आलेले शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच टोला लगावला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची एक तुकडी बुधवारी उत्तर प्रदेशला रवाना झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यकर्त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांची फिरकी घेतली. 

राज्यमंत्री सत्तार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप - सेना युतीचा पूल केवळ नितीन गडकरीच बांधू शकतात असे विधान केले होते. याबद्दल फडणवीस यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले, नितीन गडकरी हे आमचे मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल अशी भावना असू शकते.

परंतु, हे विधान अन्य कुणी मोठ्या नेत्याने केलं नाही. सत्तार हे काँग्रेस सोडून शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत नया है वह असं म्हणेन. असं बोलायला महत्वाचे माणूस लागतं. त्यांना सेनेचं काय माहित आहे असा टोला फडणवीस यांनी लगावला.