Mhada lottery 2024: तुम्हीदेखील मुंबईत घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहात आहात आणि तुम्ही म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज भरलाय? मग ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या मुंबई विभाग मंडळाकडून 2,030 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. यावेळच्या लकी ड्रॉ लॉटरीसाठी म्हाडाकडे 1 लाख 34 हजार 350 अर्ज प्राप्त झाले आहेत. असे असले तरी केवळ 1 लाख 13 हजार 811 अर्जदारांनी सिक्योरिटी डिपॉझिट भरले आहे. म्हाडाच्या तिजोरीत 5 कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे.
म्हाडाच्या मुंबई विभागीय मंडळाने 2030 घरांसाठी सोडत काढली होती. 9 ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरु झाली. यासाठी इच्छुकांना 19 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 पर्यंत अर्ज करता येत होते. घरांची तात्पुरती यादी आज संध्याकाळी ६ वाजता म्हाडा बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली. 29 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:00 वाजेपर्यंत कोणतीही हरकत किंवा दावा ऑनलाइन नोंदवला जाणार आहे.
तात्पुरती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, स्वीकृत अर्जांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 6:00 वाजता वेबसाइटवर यादी जाहीर केली जाईल. यानंतर 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नरिमन पॉइंट, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे लॉटरी निघणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबई विभागीय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
म्हाडाकडून 2,030 घरांसाठी लॉटरी काढली जात आहे. मुंबईतील गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर आणि लोअर परेल भागात ही घरे आहेत. या प्राइम हाऊससाठी म्हाडाने घर खरेदीवर 10 ते 25 टक्के सूटही दिली आहे.