मुंबई : सनदी अधिकारी आणि 'मेट्रो ३' च्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अश्विनी भिडे यांना बढती देण्यात आलीय. अश्विनी भिडे यांना सचिव पदावरून प्रधान सचिव पदी बढती देण्यात आलीय. ही नियमित बढती असल्याचं सांगितलं जातंय. उद्यापासून अर्थात दिनांक १ जानेवारी २०२० पासून अश्विनी भिडे या सचिवपदाची जबाबदारी पेलतील. त्यांना सध्याच्याच पदावर स्थानापन्न पदोन्नती देण्यात येत असल्याचं पत्र अप्पर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांच्याकडून धाडण्यात आलंय.
BREAKING NEWS :
मेट्रोच्या कार्यकारी संचालक अश्विनी भिडे यांची सचिव पदावरून प्रधान सचिव पदी बढती... @AshwiniBhide #AshwiniBhidehttps://t.co/HOK58cBO5u pic.twitter.com/AnLR79caYQ— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 31, 2019
बढती झाल्यानंतर अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो प्रकल्पातून उचलबांगडी होणार का? असा प्रश्नही आता विचारला जातोय. तूर्तास तरी अश्विनी भिडे यांची मेट्रो प्रकल्पातून बदली करण्यात आलेली नाही.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात कुलाबा ते सीप्झ या मार्गावर धावणाऱ्या 'मेट्रो ३' प्रकल्पाला विरोध वाढत असतानाही प्रकल्प रेटून नेल्यात अश्विनी भिडे यांनी पुढाकार घेतलेला पाहायला मिळाला. आरे कारशेड बांधकामातही त्यांच्यात आणि पर्यावरणवाद्यांमध्ये अनेकदा फैरी झडल्या. 'आरे' भागात रात्रीच झाडे कापण्यात आल्यानंतर आंदोलकांसहीत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी अश्विनी भिडे यांच्यावर टीका केली होती.
'मेट्रो ३' प्रकरणावरून त्यांच्यावर अनेकदा टीकाही झाली. परंतु, त्यांनी अनेकदा सोशल मीडियावरूनही या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला.