ट्विटर ट्रेंडिंग होतोय #MeToo

वासनांची शिकार ठरलेल्या अनेक कळ्या.... अनेक देशांत.... अनेक वेळा, अनेक राक्षसांच्या हातून कुस्करल्या गेल्या...... ती खदखद, तो असंतोष, ते गुदमरलेलंपण, ती हतबलता, ती चीड, तो सहन केलेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार या सगळ्याचं व्यक्त झालेलं रुप म्हणजे #MeToo

Updated: Oct 23, 2017, 03:46 PM IST
ट्विटर ट्रेंडिंग होतोय #MeToo title=

मुंबई : वासनांची शिकार ठरलेल्या अनेक कळ्या.... अनेक देशांत.... अनेक वेळा, अनेक राक्षसांच्या हातून कुस्करल्या गेल्या...... ती खदखद, तो असंतोष, ते गुदमरलेलंपण, ती हतबलता, ती चीड, तो सहन केलेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार या सगळ्याचं व्यक्त झालेलं रुप म्हणजे #MeToo

सध्या ट्विटर, फेसबुक आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा हॅशटॅग..... हा आवाज आहे लैंगिक छळाविरोधातला...... कळ्या कुस्करणा-या हातांचा निषेध करणारा..... ज्यांनी ज्यांनी लहानपणी, ऑफिसमध्ये, प्रवासामध्ये, घरी, बाहेर कुठेही असा अत्याचार सहन केला, अशा अनेक जणी पुढे आल्या.... आणि बघता बघता #MeToo ट्रेण्डिंग झाला. 

हॉलिवूडचा प्रख्यात प्रोड्युसर हार्वे विनस्टिन याच्याविरोधात लैंगिक छळाचे आरोप झाल्यावर अभिनेत्री अलिसा मिलानो हिनं 15 ऑक्टोबरला एक ट्विट केलं. " ज्यांच्या ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेत, त्या सगळ्यांनी पुढे येऊन  #MeToo पोस्ट केलं तर या लैंगिक अत्याचारांची भीषणता केवढी मोठी आहे, हे जगाला कळेल.

मिलानोचं हे ट्विट पडताच अवघ्या 24 तासांच्या आत #MeToo ट्विटरवर ट्रेंण्डिंग झालं. एका दिवसात #MeToo पोस्ट करणारे पाच लाख ट्विटस पडले. फेसबुकवर असंख्य प्रमाणात हीच पोस्ट शेअर झाली. हॉलिवू़ड सेलिब्रेटीज अँजेलिना जोली, लेडी गागा, पॅट्रिशिया आर्केट आणि डेब्रा मेसिंग यांच्यासह लाखो सामान्य मुलींना #MeToo जवळचा वाटला. विविध देशांमध्ये त्यांच्या त्यांच्या भाषेत #MeToo ची भाषांतरं झाली आणि तिथेही ते हॅशटॅग ट्रेण्डिंग झाले. विशेष म्हणजे काही पुरुषांनीही लैंगिक अत्याचाराचे बळी ठरल्याचं सांगत #MeToo पोस्ट केलं. 

ज्याच्यामुळे हे सगळं सुरू झालं, तो हॉलिवूडचा प्रोड्युसर हार्वे विनस्टिन  लैंगिक अत्याचारांसाठी कुप्रसिद्ध आहे.... त्याच्याविरोधात अनेकांनी तक्रारी केल्यायत. ऐश्वर्या रॉयशीही त्याला एकांतात भेट हवी होती, असंही बोललं जातंय. पण ऐश्वर्या आणि विनस्टीनची भेट ऐश्वर्याच्या मॅनेजरनं होऊ दिली नाही, असा दावा ऐश्वर्याच्या तत्कालीन मॅनेजरनं केलाय. 

मुंबईसह भारतातही अनेक महिलांनी सोशल मीडियावर #MeToo पोस्ट केलंय.... त्याची दखल मुंबई पोलिसांनीही घेतलीय. #MeToo संदर्भात पोलिसांनी एक चित्र पोस्ट केलंय. त्यामध्ये लैंगिक अत्याचारासंदर्भात काहीही घडलं तरी पोलिसांकडे तक्रार करा, असा संदेश देण्यात आलाय. 

मान्सून वेडिंग, इन्कार, हायवे अशा अनेक बॉलिवूड सिनेमांमधून बॉलिवूडनं बालशोषण, लैंगिक अत्याचार मांडण्याचा प्रयत्न केला.... ब-याच सामाजिक संस्था त्यासाठी काम करतायत.... पण आजही लैंगिक छळ थांबलेले नाहीत. सोशल मीडियावर #MeToo पोस्ट करणा-यांची संख्या म्हणजे हिमनगाचं फक्त एक टोक आहे... सोशल मीडियाशी संबंध असणा-या किंवा नसणा-या अनेक जणी अगदी याही क्षणाला लैंगिक अत्याचाराच्या शिकार होत असतील..... पण निदान ती शांतता आता #MeToo च्या रुपातून व्यक्त व्हायला लागलीय...... लैंगिक अत्याचार करणा-यांनो सावधान, #MeToo ही कदाचित सुरूवात आहे..... त्याच्या पुढचं पाऊल हे लैंगिक अत्याचार करणा-यांना धडा शिकवणारं असेल....