अजित पवार यांचे छगन भुजबळ यांच्याकडून मनधरणीचे प्रयत्न

अजित पवार यांना समजावण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरुच आहेत.  

Updated: Nov 25, 2019, 10:47 AM IST
अजित पवार यांचे छगन भुजबळ यांच्याकडून मनधरणीचे प्रयत्न title=
संग्रहित छाया

मुंबई : अजित पवार यांना समजावण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरुच आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असे सांगत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आज पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीसाठी गेलेत. त्यांनी तासभर चर्चा केली. यावेळी भुजबळ यांनी सांगितले, सरकार येतं आणि जात घर तुटू नये. 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे महाविकासआघाडीचे सरकार राज्यात येणार, असे वाटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्याने राज्याच्या राजकारणला वेगळीच राजकीय कलाटणी मिळाली. या घटनेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांनी दिलेल्या दे धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी पुढे सरसावले आहेत. राष्ट्रवादीने आपल्या काही आमदारांना माघारी आणले आहेत. दरम्यान, भाजपकडे बहुमताचा आकडा नसल्याने तो जुळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुसरीकडे राजकीय घडामोडीनंतर सत्तास्थापन करण्यात आल्यानंतर या प्रकरणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे तीन आमदार माघारी आल्याने पुन्हा अजित पवार एकटे पडलेले दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी तीन आमदार पक्षात परत आले आहेत. अनिल भाईदास पाटील, दौलत दरोडा आणि नरहरी झिरवळ हे तिघेही दिल्लीहून मुंबईला परत आले आहेत. गुडगावमधल्या हॉटेल हयातमध्ये या आमदारांना ठेवण्यात आलं होते. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया धुगन यांनी या आमदारांना मुंबईत आणलं. अजित पवारांसोबत आता केवळ पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे आहेत. त्यामुळे अण्णा बनसोडेही पक्षात परतणार की अजित पवारांसोबतच राहणार याकडे लक्ष आहे. 

तर दुसरीकडे अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. फक्त राष्ट्रवादीच नाही तर शिवसेनाही अजित पवारांच्या मनधरणीसाठी स्वत:चा हट्ट बाजूला ठेवायला तयार आहे. रविवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली. चर्चेचे मूळ होते ते अजित पवार. अजित पवारांचे मनधरणीचे प्रयत्न राष्ट्रवादीतल्या दिग्गज नेत्यांनी केले. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे आता शिवसेनेने अजित पवारांच्या मनधरणीसाठी ब्रह्मास्त्र वापरायचे ठरवले आहे. त्यामुळे राजकारणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.