परिस्थिती बघूनच शाळा-महाविद्यालये सुरु ठेवा- विनोद तावडे

या बंदसाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत. 

Updated: Jul 24, 2018, 10:22 PM IST
परिस्थिती बघूनच शाळा-महाविद्यालये सुरु ठेवा- विनोद तावडे  title=

मुंबई: मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक दिली आहे. मात्र, या बंदमधून शाळा, महाविद्यालयांसह अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. परंतु, मराठा आंदोलनाची तापलेली परिस्थिती पाहता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सावधानतेची सूचना दिली आहे. 

मुंबई बंदमधून शाळा आणि महाविद्यालयं वगळली असली तरी, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील पोलीस आणि प्रशासन घेईल, असे तावडे यांनी सांगितले. त्यामुळे उद्या परिस्थिती पाहूनच प्रशासन याबाबत निर्णय घेईल. तर या बंदसाठी मुंबई पोलीस सज्ज असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

दादरच्या मराठा मंदिर येथील सभागृहात आज दुपारी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उद्या (बुधवारी) मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. या बंदतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच शाळांच्या बसेसही सुरु ठेवण्यात येणार आहेत.

उद्याच्या बंददरम्यान कोणतीही हिंसा न करता शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी केले आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.