ठाकरे सरकार : ...असं असू शकेल महाराष्ट्र विकास आघाडीचं खातेवाटप

खातेवाटपाची प्राथमिक माहिती 'झी २४ तास'च्या हाती

Updated: Dec 11, 2019, 10:17 AM IST
ठाकरे सरकार : ...असं असू शकेल महाराष्ट्र विकास आघाडीचं खातेवाटप  title=

दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन अखेर १४ व्या दिवशी सरकारचे खातेवाटप अंतिम टप्प्यात आले आहे. खातेवाटपाची प्राथमिक माहिती 'झी २४ तास'च्या हाती लागलीय. यानुसार गृह, नगरविकास आणि गृहनिर्माण या तीन खात्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू होती. या खात्यांचा वाद मिटला असून कुठल्या पक्षाकडे कुठली खाती असतील, हे जवळपास निश्चित झालं आहे.

(अधिक वाचा - 'शपथविधी दणक्यात पण ठाकरे सरकार काम कधी करणार ?')

गृह आणि नगरविकास ही महत्त्वाची खाती शिवसेनेकडेच राहणार आहेत. तर अर्थ आणि गृहनिर्माण ही खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत. महत्त्वाचे महसूल खातं काँग्रेसकडे असणार आहे. भाजप शिवसेनच्या काळात भाजपकडे असलेली नगरविकास, गृह ही महत्वाची खाती आता शिवसेनेकडे आली आहेत. तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात असेल्या खात्यांमध्येही अदलाबदल करण्यात आली आहे. 

जलसंपदा, आदिवासी विकास ही महत्त्वाची खाती आता राष्ट्रवादीकडे न राहता काँग्रेसच्या वाट्याला गेली आहेत. तर सहकार हे काँग्रेसकडं असलेलं खातं आता राष्ट्रवादीकडे येणार आहे. आता मुख्यमंत्री या खात्यांचं मंत्र्यांना प्रत्यक्ष वाटप कधी करणार? याकडे लक्ष आहे. 

(अधिक वाचा - एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे घुसखोरांचे धाबे दणाणले)

सूत्रांकडून 'झी २४ तास'ला मिळालेली खातेवाटपाची यादी पुढीलप्रमाणे आहे...

शिवसेना

- गृह

- नगरविकास

- परिवहन

- उद्योग

- सामाजिक न्याय

- पर्यावरण

- उच्च व तंत्रशिक्षण

राष्ट्रवादी काँग्रेस

- वित्त आणि नियोजन

- गृहनिर्माण

- कृषी

- सार्वजनिक आरोग्य

- सहकार

- सार्वजनिक बांधकाम

काँग्रेस

- महसूल

- ऊर्जा

- जलसंपदा

- आदिवासी विकास

- वैदकीय शिक्षण

- शालेय शिक्षण

- महिला व बालकल्याण

दरम्यान, उद्धव ठाकरे सरकारच्या लांबत असलेल्या खातेवाटपाच्या घोळावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी टीकास्त्र सोडलं होतं. मलाईदार खात्यांसाठी मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरू आहे का...? असा सवाल अण्णांनी विचारला होता. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही अण्णांनी काल केली होती.