बागेश्री कानडे, मुंबई/ विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : दुधापेक्षा शरीराला बियर बरी, धक्का बसला ना... आता हे ऐकल्यावर काही लोक आनंदीही होऊ शकतात त्यात वाद नाही, मात्र 'पेटा'ने केलेल्या दाव्यानुसार शरीराला दुधापेक्षा बियर बरी असं सांगितलयं. आता या दाव्यानंतर रडाव की हसावं? असा प्रश्न अनेकांना पडलाय..
दारू आणि बिअर पिणं हे वाईट असतं असेच संस्कार तुम्हा-आम्हा भारतीयांवर झाले आहेत. थोरामोठ्यांनी दिलेल्या शिकवणीला धक्का देणारा दावा 'पेटा' या प्राणीप्रेमी संस्थेने केला आहे. दुधापेक्षा बिअर भारी असा धक्कादायक दावा 'पेटा' संस्थेने केला. बिअरमध्ये फायबर, कँल्शिअम, आणि लोह असतं. बिअर प्यायल्याने हाड मजबूत होतात असा दावा 'पेटा'ने केला आहे. उलट दूध का पिऊ नये यासाठीही त्यांच्याजवळ कारण आहे.
'पेटा'च्या या दाव्यावर डॉक्टरांनी टीकेची झोड उठवली आहे. दूध काही ठिकाणी अपायकारक असेल मात्र दुधापेक्षा बिअर चांगली असूच शकत नाही असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
'पेटा' ही संस्था प्राण्यांसाठी काम करते. लोकांनी शाकाहारी व्हावं असा त्यांचा आग्रह आहे. गाईचं दूध काढणं म्हणजे क्रूरता आहे असंही ही संघटना म्हणते. इथपर्यंत सगळं ठिक आहे. दुधाऐवजी बिअर प्या असं सांगणं थोडं अतिच होतं. पेटाच्या या सल्ल्याचा अनेक तळीराम त्यांच्या पद्धतीनं वापर करतील यात शंका नाही.