विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत ट्विस्ट, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्याना दिला 'हा' सल्ला?

शरद पवार-मुख्यमंत्र्यादरम्यान चर्चा झाल्यानंतर निवडणूक न घेण्याचा निर्णय

Updated: Dec 28, 2021, 02:15 PM IST
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत ट्विस्ट, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्याना दिला 'हा' सल्ला? title=

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही हे आता जवळपास निश्चित झालं आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना चार पत्र लिहिली. पण त्यावर हरकत घेत राज्यपालांनी तांत्रिक कारणास्तव निवडणूक शक्य नसल्याचं म्हटलं. यानंतरही मविआ सरकारकडून निवडणूकीसाठी प्रयत्नशिल होती.

निवडणूक घेतली असती तर...
राज्य सरकारनं विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली असती तर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट  लावण्याची शिफारस केली असती अशी भीती महाविकास आघाडी सरकारला होती. राज्यपालांचं पत्र आल्याने निवडणूक न घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यामुळे बराच खल केल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे. 

राज्यपालांच्या मान्यतेशिवाय निवडणूक घेतली असती तर घटनात्मक पेच निर्माण झाला असता. हाच धागा पकडून राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस राष्ट्रपतींना केली असती अशी भीती महाविकास आघाडी सरकारला वाटत होती राज्यपालांनी आज सरकारच्या पत्राला उत्तर दिल्यानंतर निवडणूक न घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे आता अध्यक्षपदाची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हणजेच नागपूरमध्ये ठरण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांनी दिला सल्ला
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संदर्भात शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा झाली. यावेळी कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. शरद पवारांनी विधानसभा अध्यक्ष निवडणूक न घेण्याचा सल्ला दिला असून त्यावर एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.