मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने असं काही कृत्य केलं आहे की ज्यामुळेभाजप सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मंत्री महोदय रस्त्याच्या कडेला उभे राहून लघुशंका करताना दिसत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव येथे राम शिंदे जलयुक्त शिवार योजनेंर्गत केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सोलापूर-बार्शी मार्गावर त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबला आणि मग राम शिंदेंनी गाडीतून उतरत रस्त्याच्या कडेलाच लघुशंका केली.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आपला बचाव करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. आजारी होतो आणि दौऱ्यावर असताना रस्त्यात कुठेही स्वच्छतागृह दिसलं नाही त्यामुळे रस्त्यात लघुशंकेला जावे लागलं असे स्पष्टीकरण राम शिंदे यांनी दिलयं.
राम शिंदे यांनी सांगितलं की, गेल्या महिन्याभरापासून सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांनिमित्त राज्यभरात दौरे करत आहे. या दरम्यान सततचा प्रवास आणि तापमानातील वाढ यामुळे मी आजारी पडलो आहे. प्रवासात शौचालय न मिळाल्याने इच्छा नसतानाही रस्त्यावरच लघुशंका करावी लागली.
राम शिंदे यांनी आपण आजारी असल्याचं म्हटलं आहे. तर, या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी होण्यास सांगत आहेत मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते या मोहिमेला हरताळ फासत आहेत".
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते उघड्यावर लघुशंका करताना दिसत आहेत.