महाराष्ट्राने मतदान केलं की ईव्हीएमने केलं? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

Aditya Thackerays Maharashtra Vidhansabha: आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 23, 2024, 05:07 PM IST
महाराष्ट्राने मतदान केलं की ईव्हीएमने केलं? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल  title=
आदित्य ठाकरे

Aditya Thackerays Maharashtra Vidhansabha: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे कल समोर आले आहेत. ज्यामध्ये महायुतीला भरघोस यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या पोलनुसार, महायुती 228 जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी 47 जागांवर आघाडीवर आहेत. या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

अपेक्षित होतं तसे निकाल आले नाहीत. महाराष्ट्राने मतदान केलं की ईव्हीएमने केलं? हा प्रश्न असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. आता आम्ही आढावा घेतोय. याच महाराष्ट्राने आम्हाला लोकसभेला साथ दिली. यात ईव्हीएमने किती साथ दिली हे पाहावे लागेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. काही निकाल आजच्या सारखे अपेक्षित नव्हते, असेही त्यांनी सांगितले.

'मतपत्रिकांवर पुन्हा निवडणूक घ्या!'

महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही. बॅलेट पेपर म्हणजेच मतपत्रिकावर पुन्हा निवडणूक घ्या!, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. जगाच्या पाठीवर निवडणुकीत इतका फ्रॉड झाला नसेल, असे राऊत म्हणाले. हा निकाल मान्य नाही! नाही! त्रिवार नाही!
लोकशाही आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची  लढाई सुरूच राहील, असेही राऊत पुढे म्हणाले. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचा इतका मोठा विजय झाला असावा यावर संजय राऊत म्हणाले, "मला असं वाटत नाही. महाराष्ट्रात लाडके भाऊ, लाडके मामा, लाडके काका, लाडके आजोबा, लाडके दादा नाहीयेत का? मी परत सांगतो की, ही मोठी गडबड आहे. महाराष्ट्रावर अदानींचं बारीक लक्ष होतं. काल अटक वॉरंट निघाल्यानंतर असा निकाल लागेल अशी आमच्या मनात शंका होती. अमेरिकेत अदानींवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अप्रत्यक्षपणे भाजपावरच होते. या निवडणुकीत सर्वात जास्त पैशांचा वापर, ताकद अदानींनी केला. या निकालावर गौतम अदानींचा प्रभाव आहे का? कारण मोदी, फडणवीस, शिंदे आणि अदानी हे वेगळे नाहीत". "शरद पवारांनी महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं. त्यांना तुम्ही 10 जागा देण्यासही तयार नाही. नेमकी अशी काय गडबड महाराष्ट्रात आहे. हा निकाल जनतेचा कौल आहे हे मानण्यास आम्ही तयार नाही. निवडणुकीत जय-पराजय होत असतं, आम्हाला त्यावर काही बोलायचं नाही. पण लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचा विश्वास बसू शकत नाही," असंही संजय राऊतांनी सांगितलं.