राज्यात ६०.४६ टक्के मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक तर मुंबईसह पुण्यात निरुत्साह

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचा निरुत्साह दिसून आला. 

Updated: Oct 21, 2019, 09:43 PM IST
राज्यात ६०.४६ टक्के मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक तर मुंबईसह पुण्यात निरुत्साह  title=
संग्रहित छाया

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचा निरुत्साह दिसून आला. २०१४ पेक्षा यावेळच्या निवडणुकीत मतदानाचा आकडा खाली घसरलेला दिसून येत आहे. राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ६०.४६ टक्के मतदान झाले आहे. कोल्हापुरात ७४ टक्के सर्वाधिक तर त्याखालोखाल सिंधुदुर्गमध्ये ६०.८३ टक्के मतदान झाले आहे. तर मुंबईत केवळ ५० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक कमी मतदान कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, वर्सोवा, कुलाबा आणि पुणे कॅन्टोंमेंट आदी ठिकाणी ४० ते ४२ टक्क्यांपर्यंत मतदानाची नोंद झाली आहे.

विधानसभा चुनाव: महाराष्‍ट्र में वोटिंग खत्‍म, 60.5% हुआ मतदान

राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५५ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक ५८ टक्के मतदान कोल्हापुरात झाले. तर मुंबई, ठाण्यात निरुत्साह दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात शहरी भागात कमी टक्के मतदान झाल्याचे दिसून येत आहे. तर ग्रामीण भागाच चांगले मतदान झाले आहे. काही ठिकाणी झालेली हाणामारी आणि अमरावतीमधील हल्ला या घटना वगळता मतदान शांततेत झाले. (ही आकडेवारी प्राथमिक आहे , अजून काही मतदान केंद्रावरील आकडे आलेले नाहीत.)

 

- सिंधुदुर्गमध्ये अंदाजे सरासरी 60.83℅ 

कणकवली - 62.59%
कुडाळ - 60.21%
सावंतवाडी - 59.63%
रायगड - 5 वाजेपर्यंत 58.98 टक्के

- लातूर जिल्ह्यातील ०६ विधानसभा मतदारसंघाची सायं.०५ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी - ५७.१५% 
लातूर ग्रामीण -५९.१३ %
लातूर शहर - ५१.८५ %
अहमदपूर - ५७.११ %
उदगीर - ५६.७४ %
निलंगा - ५८.७० %
औसा - ६०.६१%

- जालना जिल्हा सायं. 5-00 पर्यंत सरासरी : 62.66 टक्के 
परतुर – 63.11
घनसावंगी – 67.69
जालना- 51.81
बदनापुर – 64.78
भोकरदन- 65.91
(जिल्हा )

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात सरासरी मतदान
228- गेवराई - 70%
229- माजलगाव- 60%
230- बीड - 65%
231- आष्टी- 58%
232- केज - 61%
233- परळी- 67%

काही ठिकाणी गालबोट

जालन्यात भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तर करमाळ्यातही दोन गट भिडल्याचे पाहायला मिळाले. बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्याच्या समर्थकांमध्ये जुंपलेली दिसून आली. जामखेडमध्ये दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला होता. तर अमरावतीमध्ये वरुड मोर्शी मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांची काही हल्लेखोरांनी गाडी जाळली आहे. आज सकाळी ही घटना समोर आली. यात उमेदवार देवेंद्र भुयार थोडक्यात बचावले असून शासकीय रुग्णालय अमरावतीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

EVM बिघाडाच्या ६५ लेखी तक्रारी

राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली होती. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद झाले आहे. तर राज्याच्या विविध भागातून EVM बिघाडाच्या तक्रारी आल्या आहेत. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे EVM बिघाडाच्या ६५ लेखी तक्रारी केल्या आहेत. त्याबाबत काय निर्णय लागणार याचीही उत्सुकता आहे.

चंद्रपूर शहरात मतदानाची टक्केवारी घटली. तीन वाजेपर्यंत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात केवळ २८ टक्के मतदान, हे मतदान ४५ टक्‍क्‍यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातही मतदानाची टक्केवारी ५० टक्‍क्‍यांच्या आसपास राहण्याचा अंदाज होता. मतदारांचा निरुत्साह आणि ईव्हीएम मधील बिघाड यामुळे टक्केवारी घटल्याचा अंदाज आहे.

बीड वडवणी तालुक्यातील खलवट लीम गाव या गावातील पूल पावसामुळे नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्यानंतर प्रशासनाने तात्काळ मदत उपलब्ध करून देत लोकांना थर्माकोलच्या तराफ्यावर बसवून मतदान केंद्रावर आणले. बीड जिल्ह्यात मतदान संथगतीने सुरू असून पाच वाजेपर्यंत ५८ टक्के मतदान झाले होते. खळवट लिम गाव या गावातील पूल पुरामुळे वाहून गेल्याने मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चप्पूची व्यवस्था केली आणि त्यावरून मतदारांना आणण्यात आले.

मच्छिमारांनी मतदानावर बहिष्कार

वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या मच्छिमारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. वाढवण बंदर परिसरातील १५ ते १६ गावातील सुमारे १० हजार मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला. वाढवण समुद्रकिनारा मच्छीमारीसाठी गोल्डन बेल्ट म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी माशांचं प्रजनन होतं. याठिकाणी बंदर झाल्यास हा गोल्डन बेल्ट नष्ट होऊन मच्छीमार देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळं आक्रमक पवित्रा घेत १५ गावांनी मतदान न करण्याची भूमिका घेतली.

मुख्यमंत्र्यांचे कुटुंबासह मतदान

राज्यातल्या दिग्गज नेत्यांनी मतदान केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात मतदान केले. नागपूर दक्षिण पश्चिममधून मुख्यमंत्री निवडणूक लढत आहेत. त्यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि आई सरिता फडणवीसही उपस्थित होत्या. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब वांद्र्यात मतदानाचा हक्क बजावला. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पत्नी रश्मी ठाकरे, वरळीमधून शिवसेनेचे उमेदवार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला.  

काँग्रेसच्या नेत्यांनी बजावला हक्क

काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यात विविध ठिकाणी मतदान केले. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये मतदान केलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमधल्या भोकरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी लेक प्रणिती शिंदेंसह सोलापुरात मतदान केलं. सोलापूर शहर मध्यमधून प्रणिती शिंदे रिंगणात आहेत. तर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी साकोलीमध्ये तर विश्वजित कदम यांनी सांगलीत मतदान केले.  

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले मतदान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये मतदान केलं, तर बारामतीचे उमेदवार अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह बारामतीत मतदानाचा हक्क बजावला. बीडचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी परळीत मतदान केलं. त्याआधी त्यांची लेक अदिश्रीनं त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियामध्ये मतदान केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या नारायणगावात सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. छगन भुजबळांनी येवल्यात मतदान केलं.