शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रीपदे, यांची नावे चर्चेत

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या रविवारी होत आहे. अनेक दिवस मंत्रिमंडलाचा विस्तार होणार होणार, अशी चर्चा होती. 

Updated: Jun 15, 2019, 04:05 PM IST
शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रीपदे, यांची नावे चर्चेत title=

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या रविवारी होत आहे. अनेक दिवस मंत्रिमंडलाचा विस्तार होणार होणार, अशी चर्चा होती. मात्र,  अखेर या विस्ताराला मुहूर्त सापडला आहे. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्धव यांच्याशी चर्चा झाल्याचे म्हटले. त्यामुळे कोणाला मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता होती. शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रीपदे येणार आहेत. यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद असणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारमधून पाच मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपचे सर्वाधिक मंत्री असणार आहे. त्यामुळे भाजपकडून नवीन चेहऱ्यांना संधी मिळणाची शक्यता आहे. तर भाजपचा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टीला एक मंत्रीपद देण्यात येणार आहे. तशी माहिती पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. मात्र, शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार याची माहिती नव्हती. आता सेनेकडून काही जणांची नावे चर्चेत आहेत.

दरम्यान, राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तसेच वादग्रस्त ठरलेले प्रकाश मेहता यांनाही डच्चू मिळण्याची शक्यता आहे. गडचिरोली पालकमंत्री आत्राम यांनाही डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सर्व मंत्री आज राजीनामे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे देतील, अशी चर्चा आहे

शिवसेनेला मंत्रीमंडळ विस्तारात दोन मंत्रीपदे मिळणार आहेत. यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद दिले जाईल अशी शक्यता आहे. यात राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले बीडचे जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेट मिळण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेचा आक्रमच चेहरा अॅड. अनिल परब यांनाही संधी आहे. तसेच तानाजी सावंत किंवा राजेश क्षीरसागर यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करताना उपमुख्यमंत्री पदावर तोडगा काढल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने या पदावर दावा सोडला आहे. कारण इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पेच निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन या पदावरुन शिवसेना माघारी हटली आहे. तसेच उपसभापती पद रिक्त असल्याने ते शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. या पदावर आमदार निलम गोऱ्हे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. हे पद शिवसेनेकडून मागितल्याचे सूत्रांची माहिती आहे. मात्र, अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.