'दम असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या' उद्धव ठाकरेंचं आव्हान, तर भाजप म्हणतं...

Maharashtra Poliltics : धारावी पुनर्विकासासंदर्भात जाब विचारण्यासाठी धारावी ते अदानी ऑफिसपर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा ठाकरे गटाने केली आहे. आपल्यासाठी नाहीतर मुंबईसाठी मोर्चा काढायचा आहे. महाशक्ती नाही तर महाजनता दाखवायची आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. मोर्चाचं नेतृत्व मी स्वत: करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

राजीव कासले | Updated: Dec 5, 2023, 04:30 PM IST
'दम असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या' उद्धव ठाकरेंचं आव्हान, तर भाजप म्हणतं... title=

Maharashtra Poliltics : दम असेल तर बॅलट पेपरवर निवडणूक घ्या, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला (BJP) दिलंय. मुंबईकरांना मुंबईच्या बाहेर काढण्याचा डाव आहे का, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी 16 डिसेंबरला मुंबईत भव्य मोर्चाची घोषणा केलीय. धारावी पुनर्विकासासंदर्भात जाब विचारण्यासाठी धारावी ते अदानी ऑफिसपर्यंत ठाकरे गट (Thackeray Group) मोर्चा काढणार आहे. मुंबईत ठाकरे गटाचं संपर्क कार्यालयाचं नूतनीकरणानंतर उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते.

निवडणूक निकालावर प्रश्न
ज्यावेळी काँग्रेस जिंकत होती, त्यावेळी हीच लोकं ईव्हिएमविरोधात होती. ईव्हीएमचा संशय खोटा ठरवण्यासाठी एकदा बॅलेटपेपरवर (Ballot Paper) निवडणूका घ्या, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. महाराष्ट्रातील महिलांवरीलअत्याचारात वाढ झाली आहे. सरकार चालवायला नालायक आहे, असं मी म्हटलं होतं, आता याला दुसरा शब्द सांगा, असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. 

निवडणूक प्रचारात देवाच्या किंवा धर्माच्या नावाने मत मागितलं तर गुन्हाहोत नाही का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत पीएम मोदी यांनी बजरंगबलीची की जय असा उल्लेख केला होता. तर मध्यप्रदेशच्या निवडणुकीत गृहमंत्री अमित शाह यांनी रामलल्लाचं दर्शन मोफत देऊ असं आश्वासन दिलं होतं. देवाच्या, धर्माच्या नावाने मत मागण्यासा आयोगाकडूनच होकार होता का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. निवडणुकीत आम्हीसुद्धा धर्माच्या नावाने जयघोष केल्यास निवडणूक आयोगाने कारवाई करु नये असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

भाजपचं जशासतसं उत्तर
उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत, असं उत्तर भाजपने दिलं आहे. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे अशी टीका तुम्हीच केली होती पण आता 22 जानेवारी रोजी मंदिराचं लोकार्पण होतंय. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला आहे, असा टोला भाजपने उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. तसंच कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका. उद्धव ठाकरे किती रडारड करणार? असंही भाजपने म्हटलंय.