ठाकरे विरुद्ध ठाकरे हायव्होल्टेज लढत? वरळीत उमेदवार देण्याची राज यांची घोषणा

Maharshtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलय.. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार याची चर्चा सुरू झालीय.

राजीव कासले | Updated: Aug 24, 2024, 07:41 PM IST
ठाकरे विरुद्ध ठाकरे हायव्होल्टेज लढत? वरळीत उमेदवार देण्याची राज यांची घोषणा title=

Maharshtra Politics :  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election) सर्व मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची घोषणा केलीय. यावेळी बोलताना त्यांनी वरळीमध्येही (Worli Constituency)  उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलंय.. वरळीत कुणीही उभं राहिलं तरी त्यांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याचं राज ठाकरे म्हणालत. एकदा आम्ही वरळीत पाठिंबा दिला आता तीच गोष्ट पुन्हा होणार नसल्याचं राज ठाकरेंनी (Raj Thackeray) स्पष्ट केलंय. वरळी मतदारसंघात मनसेची 37 ते 38 हजार मतं आहेत असं सांगत राज ठाकरे यांनी वरळीतून उमेदवार देण्याबाबत स्पष्ट संकेत दिले.

विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करत आहेत. सध्या ते विदर्भाच्या दौऱ्यावर असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतायत. नागपुरमधल्या 12 विधानसभा मतदारसंघाचा आढावा त्यांनी घेतलाय. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरळीत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं. 

मनसेचा उमेदवार कोण?
वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात मनसेकडून कोण मैदानात उतरणार याची चर्चा सुरू झालीय. संदीप देशपांडेंच्या नावाची चर्चा असली तरी त्यांचं नाव पक्षाने अधिकृत जाहिर केलेलं नाहीय. तर मागील काही काळापासून मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनीही वरळी मतदारसंघात लक्ष घातलंय. त्यामुळे वरळीमधून अमित ठाकरे विधानसभा लढणार का अशीही चर्चा सुरू झालीय. असं झालं तर वरळीमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना पाहायला मिळराय.

वरळी मतदारसंघात जशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे तशी मनसेचीही ताकद आहे.. जर आदित्य ठाकरेंसमोर अमित ठाकरेंचं आव्हान असेल तर आदित्य यांच्यासाठी वरळीचा गड नक्कीच सोपी नसणाराय. 

विधानसभेत 250 जागा लढवणार
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नव निर्माण सेना थेट महाराष्ट्रात जवळपास 250 जागा लढवणार आहे. संभाव्य उमेदवारांना आपल्या मतदार संघात कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी राज ठाकरे यांनी उमेदवारही जाहीर केली आहे.  यवतमाळच्या वणी मतदार संघात राजू उंबरकरांना मनसेकडून उमेदवारी देण्यात आली असून मुंबईतील शिवडी मधून बाळा नांदगावकर, पंढरपूर मधून दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीण मतदारसंघातून संतोष नागरगोजे, हिंगोलीतून प्रमोद उर्फ बंडू कुटे, चंद्रपूर येथून मनदीप रोडे,  राजुरा मतदार संघातून सचिन भोयर यांच्या उमेदावारीची घोषणा करण्यात आली आहे. 

कोकणातील खेड-दापोली-मंडणगड विधानसभा जागेसाठी वैभव खेडेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर, भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शैलेश बिडवे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. नवी मुंबई विधानसभा मतदारसंघातून गजानन काळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात साईनाथ बाबर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.