शिंदे गटाचे अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाणार? राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडतायत. सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे सरकारविरोधात आला तर अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरुच आहेत. त्यात आता शिंदे गटाचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा रंगलीय. याच नाराजीचा फायदा उचलून ठाकरे एकनाथ शिंदेंना धक्का देण्याच्या तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

वनिता कांबळे | Updated: Apr 25, 2023, 06:59 PM IST
शिंदे गटाचे अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाणार? राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार title=

Maharashtra Politics:  ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांना  जबरदस्त धक्का देण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यानेच यासंबंधी एक सूचक विधान केले आहे आहे. यामुळे येत्या काळात राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार अशी चर्चा रंगली आहे. शिंदे गटातील नेत्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे महाविकास आघाडी अधून मजबूत करण्यासाठी देखील प्रयत्न करताना दिसत आहेत. 

नाराजीचा फायदा उचलून ठाकरे एकनाथ शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत

राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडतायत. सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे सरकारविरोधात आला तर अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरुच आहेत. त्यात आता शिंदे गटाचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा रंगलीय. याच नाराजीचा फायदा उचलून ठाकरे एकनाथ शिंदेंना धक्का देण्याच्या तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिंदे गटाच्या नाराज आमदारांसाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे खुले केले

शिंदे गटाच्या नाराज आमदारांसाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे खुले केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  याबाबत दुसरं तिसरं कुणी नव्हे तर ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि उपसभापती नीलम गो-हेंनीच सूचक विधान केले आहे. पक्ष सोडून गेलेले कुणी परत येणार असतील तर त्याबाबतचा निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ घेणार. कोणाच्या मागे ED लागली की काय ते पाहिलं जाईल. पण, एक नक्की की कोणी कुठेही जाऊ शकतो. निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरण्या पर्यंतच्या काळात काहीही घडू शकते असं सूचक विधान त्यांनी केले आहे. 

40 आमदार शिंदेंसोबतच असल्याचा शिंदे गटाचा  दावा 

एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेतील 40 आमदार आणि 10 अपक्ष असे मिळून 50 आमदार आहेत. मात्र, शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेनेच्या 40 पैकी फक्त 10 आमदारांनाच मंत्रीपद मिळाले आहे. अपक्ष आमदारांना तर मंत्रीपदही मिळालेने नाही. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही प्रलंबित आहे. त्यात सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात आला तर शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं. अशा परिस्थितीत अजित पवार भाजपसोबत येणार असतील तर आपलं भवितव्य काय याच चिंतेतून शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. त्यात नीलम गो-हेंच्या विधानामुळे या चर्चांना आणखीनच बळ मिळाले आहे.