'तर एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती' मंत्री दीपक केसरकर यांचा सनसनाटी गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि 40 आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. आज या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंड म्हणजे गद्दारी असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जाते. आज शिंदे गटाचे नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 20, 2023, 09:06 PM IST
'तर एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती' मंत्री दीपक केसरकर यांचा सनसनाटी गौप्यस्फोट title=

Maharashtra Pollitics : आमदारांचं बंड यशस्वी झालं नसतं तर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) डोक्यात गोळी झाडून घेणार होते, असा सनसनाटी गौप्यस्फोट शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) केला आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी बंड केलं. शिवसेनेच्या वर्धापन दिनी एकनाथ शिंदे यांचा अपमान झाला. पक्षातील एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान करण्यात आला, त्यांना खालच्या दर्जाची वागणूक देण्यात आली, असा खुलासाही केसरकर यांनी केला आहे. 

एकनाथ शिंदे हा एक सच्चा मनुष्य आहे, एक सच्चा शिवसैनिक (Shivsainik) आहे. ज्यावेळी शिंदेंना असं वाटायला  लागलं की हा उठाव यशस्वी होणार की नाही, त्यावेळी एकच गोष्ट केली असती आपल्याबरोबर आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवून दिलं असतं, एक फोन केला असता आणि सांगितलं माझी चूक झाली, पण यांची काही चूक नाही आणि तिथेच डोक्यात गोळी झाडून घेतली असती असं शिंदे यांनी आपल्याला सांगितलं. आमदारांचं नुकसान होता कामा नये प्रसंगी जीव गेला तरी चालेल, असं म्हणणाऱ्या माणसाच्या मागे लोकं उभी नाही राहाणार तर कोणाच्या मागे राहाणार, असं स्पष्टीकरण दीपक केसरकर यांनी दिलं.

तुम्हाला परंपरेतून सर्व मिळालं आहे, पण शिंदेंना त्यांच्या वागणुकीतून मिळालं आहे. राजकारणाचं काय होईल ते होईल, पण एक सच्चा मनुष्य लोकांसाठी झगडतो, हा प्रेम करण्याजोगाच मनुष्य असतो. म्हणून हे प्रेम महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दिलं पाहिजे. त्यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे असं आवाहन केसरकर यांनी केलं. 

शरद पवारांचं बंड, आमची गद्दारी? 
शरद पवार (Sharad Pawar) त्यावेळी काही आमदार घेऊन बाहेर पडले, त्यावेळी त्यांनी बंड केलं, ते जर बंड असेल तर आमची काय गद्दारी आहे का? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला आहे. अनेक आमदारांना, खासदारांना भेट मिळत नव्हती. ते राजा आहेत का आपल्या मनाला वाटेल तसं वागावं, अशी टीकाही केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली. तुम्ही पक्षप्रमुख होतात, तर मुख्यमंत्रीपद का स्विकारलं? तुम्हाला राज्य चालवता येत नव्हतं, आमदारांना भेट देत नव्हते, मग लोकांची काम कशी होणार असे प्रश्नही केसरकर यानी उपस्थित केले. 

मुंबई महापालिकेत घोटाळे
मुंबई महापालिकेबाबत गगंभीर आरोप झाले आहेत, 4755 कोटींच्या कामात पालिकेचे नुकसान झालं आहे, काळ्या यादीतील कंत्राटदाराना कामे देण्यात आल्याचे आरोप आहेत. 12 हजार  कोटींचा घोटाळा हा कॅगने ठपका ठेवलेला आहे, मग चौकशी करायची नाही का ? कोणाचंही अजून नाव घेतलेले नाही मग तुम्ही पत्रकार परिषद का घेता ? असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला आहे.