सामनात देवेंद्र फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका, भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट... ठिकठिकाणी आंदोलनं

भाजप आणि ठाकरे गटात आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे. याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे.

राजीव कासले | Updated: Aug 19, 2023, 05:17 PM IST
सामनात देवेंद्र फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका, भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट... ठिकठिकाणी आंदोलनं title=

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचं  मुखपत्र असलेल्या सामनातून (Saamana) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis)  खालच्या भाषेत टीका केल्यावर आता भाजप कार्यकर्त्यात संतापाची लाट उसळलीय. भाजप  कार्यकर्त्यांनी सामनाविरोधात मुंबईत जागोजागी आंदोलन (Protest) केलं जात आहे. भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झालेत. मुंबईतल्या भाजपच्या नरिमन पॉईंटमधल्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी (BJP Workers) सामना वृत्तपत्राची होळी केली.  सामना आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  सामनाची होळी केल्यानंतर घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. यावेळी आक्रमक भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

सामनाविरोधात तक्रार करणार
फडणवीसांवरील टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेअखर बावनकुळे यांनीही प्रत्युत्तर दिलंय. सामना विरोधात तक्रार करून राज्यभर आंदोलन करणार असल्याचं बावनकुळे म्हणाले. सत्ता गेल्याचं आणि सत्ता कधीच न येण्याचं दु:ख ठाकरे गटाला आहे. हे दु:ख सामनातून मांडून ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठित खंजीर खुपसून आपण जी चूक केली आहे, ती चूक यांच्या लक्षात येत आहे , म्हणून सामनातून अशी प्रकारची टीका केली आहे. सामना वृत्तपत्राविरोधात तक्रार करणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. 

संजय राऊत यांचं उत्तर
चंद्रशेखर बावनकुळे यांना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. बावनकुळे यांना इतक्या मिरच्या झोंबवण्याचं कारण काय असा सावल संजय राऊत यांनी विचारला आहे. पण अजून त्यांना खरी मिरची झोंबायची आहे, 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदाचा दिलेला शब्द भाजपने मोडला, ते शब्दाला जागले नाहीत अशी टीका संजय राऊत यांनी दिली आहे. 

सामनातून काय म्हटलंय?
सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांवर टीका करण्य़ात आलीय. फडणवीसांना उप झाल्याचा वैफल्य आलंय. त्यांना न्यूनगंडाने अस्वस्थ केलंय अशी टीका फडणवीस यांच्यावर करण्यात आलीय. 'आपले मुख्यमंत्री सहसा झोपत नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस सदैव अर्धग्लानी अवस्थेत आहेत. "मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. बोलल्याप्रमाणे तसेच झालेही होते, परंतु काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच," असे फडणवीस यांनी पुनः पुन्हा, पुनः पुन्हा सांगितले आहे. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार होते, पण त्यांच्या हायकमांडने त्यांना 'उप' म्हणून पुन्हा पाठवले. आज हे 'उप' एका अननुभवी, बेइमान, भ्रष्ट माणसाच्या हाताखाली काम करीत आहेत, अशी टीका फडणवीस यांच्यावर करण्यात आली आहे.