'फडणवीस-परमबीर यांच्यात डील झाली होती' अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Politics : अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलाय. फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच परमबीर सिंहनं आपल्यावर आरोप केले होते, असा दावा देशमुखांनी केलाय. फडणवीस आणि परमबीर यांच्यात डील झाली होती, असा आरोपही देशमुखांनी केलाय. 

राजीव कासले | Updated: Aug 5, 2024, 09:42 PM IST
 'फडणवीस-परमबीर यांच्यात डील झाली होती' अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ title=

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात 100 कोटी वसुली प्रकरणाच्या वादाचा नवा अंक सुरू झालाय. चांदीवाल आयोग सार्वजनिक करण्याच्या मागणीनंतर आता अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) नवा बॉम्ब टाकलाय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यात डील झाली होती. त्यानुसारच परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले, असं म्हणत देशमुखांनी पुन्हा फडणवीसांवर निशाणा साधलाय. यापुढे जात अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणावरूनही परमबीर आणि फडणवीसांमध्ये संवाद झाल्याचा दावा देशमुखांनी केल्याने खळबळ उडालीय.

काय म्हणाले देशमुख
चांदिवाल आयोगाचा अहवाल मविआच्या काळातच आला. सरकार पडल्याने अहवाल सादर करू शकलो नाही असं अनिल देशमुखांनी म्हटलंय. तर चांदिवाल आयोग फडणवीसांनी आता जनतेसमोर आणावा. 1400 पानी अहवाल सादर केल्यानंतर जनतेला खरं खोटं काय ते कळेल. असं थेट आव्हान देशमुखांनी दिलंय. देशमुखांच्या या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र फारसं बोलणं टाळत मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिलीय.  झूठ बोले कौवा काटे अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिलीय.

तसंच अलिकडच्या काळात मी अनेकांचा लाडका झालोय. अनिल देशमुख लपवाछपवी करतात. त्यांच्यावर असलेली केस भाजप, केंद्र सरकारनं टाकलेली नाही. माननीय चीफ जस्टिसच्या बेंचने हायकोर्टाने केस टाकली आणि त्यामुळे ते तुरुंगात गेले, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. 

गेल्या काही दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. चांदीवाल अहवालावरून सुरू झालेली खडाजंगी आता थेट परमबीर सिंग यांच्यापर्यंत येऊन ठेपलीय. विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना जुन्या मुद्यावरून पुन्हा राजकारण पेटलंय..

सचिन वाझेचा पुन्हा लेटरबॉम्ब
दरम्यान सचिन वाझेनं पुन्हा एकदा लेटरबॉम्ब टाकलाय. वाझेने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालंय. सचिन वाझे हा सध्या जेलमध्ये आहे. त्याने जेलमधून लिहिलेलं पत्र व्हायरल झालंय. या पत्रात त्याने अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. जयंत पाटील यांनी अवैध काम करुन घेतलं, अनिल देशमुख माझ्यावर दबाव आणत होते. दबावाखाली येऊन अनेक अवैध कामं केली. चांदीवाल समितीला जबाब देतानाही दबाव होता असं वाझेने म्हटलंय. 

अनिल देशमुखांनी पीएमार्फत पैसे घेतले होते. पोलीस निरीक्षकाच्या बदलीसाठी घेतले 25 लाखॉ, सुखदा निवासस्थानी देशमुखांनी 25 लाख रुपये घेतले असा आरोपही वाझेने केलाय.