Ajit Pawar भाजपच्या वाटेवर? दादा होणार एकनाथ शिंदे पार्ट -2? मविआचं टेन्शन वाढलं

राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच  पुढचा महिना पक्षप्रवेशाचाच असल्याचं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. 

Updated: Apr 17, 2023, 02:39 PM IST
Ajit Pawar भाजपच्या वाटेवर?  दादा होणार एकनाथ शिंदे पार्ट -2?  मविआचं टेन्शन वाढलं  title=

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरु आहे ती अजित पवारांची (Ajit Pawar). राष्ट्रवादीत (NCP) अजित पवार अस्वस्थ असून ते वेगळा विचार करतायत अशा जोरदार चर्चा आहेत.. अजित पवार यांनी भाजपावर (BJP) टीका करण्याचंही टाळलेलं आहे. तेव्हा शिवसेनेच्या (Shivsena) धर्तीवर राष्ट्रवादीतही फूट पडणार का या प्रश्नावर अनेक राजकीय अंदाज बांधले जातायत. त्यातच पुढचा संपूर्ण महिना पक्षप्रवेशाचा असल्याचं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) केलंय.  त्यामुळे चर्चा आणखीनच रंगू लागल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलारांसोबत तातडीनं दिल्लीला रवाना झालेत.

पुण्याचे कार्यक्रम रद्द
त्यातच अजित पवार यांनी पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द केल्यानं चर्चेला आणखीनच उधाण आलं आहे.  रविवारी रात्री अजित पवार यांनी कोमोठेमधल्या एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) जाऊन तिथं दाखल असलेल्या श्री सेवकांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पण तिथून पुण्याला न जाता अजित पवार थेट मुंबईतल्या आपल्या निवासस्थान पोहोचले. पुण्यात वडकी, दिवे, भिवरी, बनपुरी या गावांमध्ये अजित पवार यांचे नियोजित कार्यक्रम होते. मात्र हे कार्यक्रम रद्द करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) उपस्थित राहाणार आहेत. 

अजित पवार भाजपाच्या वाटेवर?
अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली होती. त्यानंतर अजित पवार भाजपमध्ये जाणाच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या डिग्रीसंदर्भात अजित पवार यांनी घेतलेली भूमिका पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

वज्रमूठ सभेत अजित पवार गप्प?
शिंदे अपात्र ठरले तरी सरकारला धोका नाही असा बॉम्बच दादांनी फोडला.. त्यात भाजपच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नागपुरात मविआच्या वज्रमूठ सभेत भाषण करणाऱ्या वक्त्यांच्या यादीत दादांचं नावच नव्हतं. दादांनी भाषण का केलं नाही हे स्वतच त्यांनी सांगितलं असलं तरी खरं तेच कारण होतं का याचीही चर्चा सुरु आहे.. तसं पाहायला गेलं तर शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यातील मतभेद हे महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच खमंग चर्चेचा मुद्दा राहिलाय. 2004 पासूनच अजित पवारांच्या मनात खदखद असल्याचं बोललं जातंय.

दादांच्या मनात खदखद का? 
2004 साली विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मिळूनही राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देऊ केलं होतं. तिथूनच शरद पवार-अजित पवार यांच्यातील मतभेदाला सुरुवात झाली असं बोललं जातंय.

2008मध्ये छगन भुजबळांना उपमुख्यमंत्री बनवण्यावरूनही अजित पवार नाराज होते

2012 साली अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. त्यावेळी अजित पवार यांनी अचानक राजीनामा दिला होता. 

पुत्र पार्थ पवार यांना पहिल्याच निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. तो पराभव दादांच्या जिव्हारी लागला. 

2019 मध्ये तर पहाटेचा शपथविधी उरकत अजित पवारांनी सत्तास्थापन केली होती 

अजित पवारांसोबत जे आमदार भाजपसोबत जाऊ शकतात त्यांच्याही नावाची चर्चा सुरु झालीय.. 

अदानींच्या चौकशीचा मुद्दा असोत वा मोदींच्या डीग्रीचा मुद्दा.. शिवसेना-काँग्रेस या मुद्द्यांवर आक्रमक होत असताना अजित पवारांनी अगदी विरुद्ध भूमिका घेत मविआच्या आरोपातली हवाच काढली अशी चर्चा राजकीय पटलावर रंगली होती.. आता तर दादा थेट भाजपात जाणार अशा चर्चा रंगतायत. त्यामुळे दादांच्या रुपानं राज्याला एकनाथ शिंदे पार्ट - 2 पाहायला मिळतो का.. हे पुढच्या काही दिवसात समजेलच..