Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दुसऱ्यांदा मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांसह अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis Government) सहभागी झाले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी रविवार सकाळपासून राजभवनात हालचाल सुरू होती. राष्ट्रवादीतील (NCP) जवळपास सर्व आमदार अजित पवारांसोबत आले आहेत. त्यामुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही उभी फूट पडल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे सूत्रांच्या माहितीनुसार, सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांचा समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. तरीही अजित पवार आमदारांसह शपथविधी समारंभात पोहोचले आहेत. मात्र या निर्णयाला शरद पवारांचा पाठिंबा नाही अशीही माहिती मिळत आहे. संजय राऊत यांनीही या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. भाजप ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते त्यांनाच मंत्री पदाची शपथ दिली जात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
य़ा निर्णयानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "आज राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे फडणवीस सरकारसोबत जायचा निर्णय घेतला आहे. त्याप्रकारे मी आणि सहकाऱ्यांनी शपथ घेतली. अजूनही काही मंत्रिमंडळामध्ये विस्तार केला जाणार आहे. त्यावेळी इतरांना संधी मिळणार आहे. याबाबत अनेक दिवस चर्चा सुरु होती. यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवरील सर्व एकत्र बसायचो. सध्या देश आणि राज्य पातळीवर जी काही परिस्थिती आहे त्याचा विचार करता आपण विकासाला महत्त्व दिलं पाहिजे असा माझा आणि सहकाऱ्यांचे स्पष्ट मत होतं," असे अजित पवार म्हणाले.
शुक्रवारीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला - अजित पवार
"पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या नऊ वर्षांच्या काळात जो काही कारभार चालला आहे त्यानिमित्ताने आपण बघितलं तर मजबूतीने देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त त्यांच्या बैठका होतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची बैठक होते त्यातून व्यवस्थित काही बाहेर येत नाही. आज देशात खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार काम करत होते. मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. वर्धापन दिनाच्या दिवशीसुद्धा मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती," असेही अजित पवार म्हणाले.
तरुणांना संधी देणे गरजेचं आहे - अजित पवार
"शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच राष्ट्रवादी पक्ष इथपर्यंत पोहोचला आहे. इथून पुढच्या काळात तरुणांना संधी देणे गरजेचं आहे. मी मागच्यावेळी सरकारमध्ये असताना विकासकामे हा एकच विचार करुन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. काहीजण आता टिका करतील. पण आम्हाला टिकेला उत्तर देण्याचं कारण नाही. सगळ्यांना माहिती आहे की मी फक्त कामालाच महत्त्व देत असतो. महाराष्ट्राचा विकास करणे, त्यासाठी केंद्रातून निधी कसा मिळेल याचा विचार करतो. महाराष्ट्रातील जनता समाधानी कशी राहिल आणि सगळ्या घटकांना मदत करण्याकरता आम्ही हा निर्णय घेतला," असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
निवडणुका राष्ट्रवादीच्या चिन्हाखालीच लढवणार - अजित पवार
"आम्हाला टीकेला उत्तर देण्याचं गरज नाही. महाराष्ट्राचा विकास करणं, निधी कसा मिळेल, सर्व घटकांना मदत करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. हा निर्णय सर्व आमदारांना मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या सरकारमध्ये सहभागी झालो असून, इथून पुढच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हाखालीच लढवणार आहोत. पक्ष मजबूत करण्यासाठी काम करणार आहोत," अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे.
आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो - अजित पवार
"नागालँडमध्ये सात आमदार निवडून आले. तिथे आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. काही जण वेगवेगळे आरोप करतील. वास्तविक साडेतीन वर्षापूर्वी जो निर्णय घेतला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये काम केलं. त्यामुळे जातीयवादी म्हणण्यात अर्थ नाही, शिवसेनेसोबत आम्ही जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो," असेही अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
"राज्यात डबल इंजिन सरकार आहे, त्याला आणखी एक इंजिन जोडलं गेलं आहे. त्यामुळे आता राज्याचा विकास हा बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल. या महाराष्ट्रातील जनतेला विकासाचा फायदा मिळेल. राज्यातील जनतेला विकासाचा फायदा मिळेल. मंत्रिमंडळ विस्तार आता तातडीने होईल," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.