'आम्हाला वंदे मातरम म्हणता येत नाही' अबू आझमींच्या वक्तव्यावरुन विधानसभेत गोंधळ

Abu Asim Azmi: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी वंदे मातरमवरुन केलेल्या वक्तव्यावरुन विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या वक्तव्याचे पडसाद उटमटले, भाजप आमदारांनी यावरुन गोंधळ घातला.

राजीव कासले | Updated: Jul 19, 2023, 06:58 PM IST
'आम्हाला वंदे मातरम म्हणता येत नाही' अबू आझमींच्या वक्तव्यावरुन विधानसभेत गोंधळ title=

Abu Asim Azmi: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session)  वंदे मातरमवरून (Vande Mataram) जोरदार गदारोळ झाला. आम्हाला वंदेमातरम म्हणता येत नाही असं विधान अबू आझमींनी (Abu Azmi) केलं. त्यावरून भाजप आमदार (BJP MLA) कमालीचे आक्रमक झाले. वेलमध्ये उतरून भाजप आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली. अखेर विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. वंदे मातरम धार्मिक नाही तर देशगीत आहे. त्यामुळे ही आझमींची ही भावना अयोग्य आहे असं फडणवीस म्हणाले. 

विधानसभेत काय झालं?
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वंदे मातरमवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे विधानसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीच्या मुद्दावर बोलताना अबू आझमी यांनी वंदे मातरमचा नारा देणं आपल्याला अस्विहार्य असल्याचं म्हटलं. काही जणं म्हणतात भारतात राहायचं असेल तर वंदे मातरम बोलता आलं पाहिजे. पण आम्ही असं करु शकत नाही. आम्ही केवळ ईश्वरावर विश्वास ठेवतो. अबू आझमी यांच्या वक्तव्यावर भाजप आमदारांनी आक्षेप घेत जोरदार हंगामा केला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांना शांत राहाण्याची विनंती केली. पण विनंती नंतरही सभागृहात गदारोळ सुरुच होता. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं. भाजपच्या आमदारांनी आक्षेप घेतल्यानंतर अबू आझमी यांनी त्यांना उत्तर दिलं. वंदे मातरम न म्हटल्याने देशाबद्दल असलेला माझा सन्मान कमी होत नाही, यावर कोणीही आक्षेप घेण्याचं कारण नाही, असं अबू आझमी यामी म्हटलं. 

यानंतर अबू आझमी यांनी ट्विट केलं, त्यात त्यांनी म्हटलंय, आमच्या पूर्वजांनी या देशासाठी बलिदान दिलं आहे, आम्ही भारताला आमचा देश मानतो, पाकिस्तानला नाही. इस्लामने आम्हाला ज्याने जगाची निर्मिती केली त्याच्यासमोर नतमस्तक होण्याचं शिकवलं आहे. मी वंदे मातरम म्हटलं नाही म्हणजे माझं देशावरचं आणि देशभक्तीबद्दलचा सन्मान कमी होत नाही. आम्ही या देशाचे तितकेच आहोत, जितके तुम्ही आहात. असं अबू आझमी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

भाजपाचं प्रत्युत्तर
अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदारांनी आक्षेप घेतला. अबू आझमी यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत असल्याचं भाजप नेते आशीष शेलार यांनी म्हटलंय, वंदे मातरम हे देशगीत आहे आणि त्याचा अपमान करणारी व्यक्ती सभागृहात नको असं म्हणत शेलार यांनी अबू आझमी यांचं वक्तव्य रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची विनंती केली. तर जे संविधान मानतात त्यांनी वंदे मातरम गर्वाने म्हटलं पाहिजे, अबू आझमी विष पेरण्याचं काम करत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केलाय.