कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत राज्य सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हे आरक्षण रद्द होऊ नये, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि मराठा आंदोलकांची बैठक पार पडली. यावेळी मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढता येईल का किंवा स्थगितीचा अंतरिम आदेश रद्द करता येईल का, या पर्यायांवर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले.
मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल - शिवेंद्रराजे भोसले
मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन , त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम आपण सहन करत कामा नये, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
'...मग मराठा आरक्षणाचा अध्यादेश कसा काढायचा?, पवार साहेब ग्रेट', चंद्रकांत पाटलांचा टोला
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, समितीचे सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अनिल परब, दिलीप वळसे पाटील, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, ज्येष्ठ विधिज्ञ विजयसिंग थोरात उपस्थित होते.