नितीन राऊत यांना धक्का; वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

या नेत्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे नितीन राऊत यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली होती. 

Updated: Jul 23, 2020, 11:45 AM IST
नितीन राऊत यांना धक्का; वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. नितीन राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नितीन राऊत यांनी परस्पर या बदल्या केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीसह काँग्रेसचे नेतेही नाराज होते. या नेत्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे नितीन राऊत यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली होती. यानंतर काहीवेळातच वीज कंपन्यांवरील अशासकीय सदस्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

नितीन राऊत यांना स्वपक्षीयांचाच 'शॉक'; या कारणामुळे पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

नितीन राऊत यांनी  सर्वांना अंधारात ठेवून वीज कंपन्यांवर परस्पर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. यामध्ये महापारेषण, महावितरण आणि होल्डींग कंपन्यांवरील १६ सदस्यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांचाही सल्ला घेतला नव्हता. यापैकी बहुतांश सदस्य नागपूरचे होते.

'कामं होत नाहीत, मान राखला जात नाही', काँग्रेस आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

विशेष म्हणजे नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या सदस्यांच्या नियुक्तीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आसीम गुप्ता यांनी  मंजुरी दिली नव्हती. परंतु, मध्यंतही कोरोना झाल्यामुळे आसीम गुप्ता काही दिवस सुट्टीवर होते. त्यावेळी हंगामी पदभार सांभाळणाऱ्या  दिनेश वाघमारे यांच्याकडून राऊत यांनी १६ सदस्यांच्या नियुक्तीला मंजुरी मिळवून घेतली होती.