मुंबई : आदित्य ठाकरे आहेत कुठे? सत्तास्थापनेच्या चर्चेत आदित्य ठाकरे नाहीत... 'हीच ती वेळ' म्हणत ज्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून लॉन्च करण्यात आलं... ते आदित्य ठाकरे शिवसेनेचे फक्त पोस्टर मुख्यमंत्री ठरणार का?
बाळासाहेबांना वचन दिलंय मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जनतेला साद घातली. आणि हीच वेळ साधत आदित्य ठाकरेंचं लॉन्चिंगही झालं आणि निवडणुकीत उभे राहिलेले पहिले ठाकरे निवडूनही आले... पण निकालानंतर अजूनही सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही... शिवसेनेच्या मनातले हे मुख्यमंत्री केव्हाच पोस्टरवर आले आणि गावभर पोस्टरबाजी सुरू झालीय.
निकाल लागल्यानंतर आदित्य ठाकरेंनी नाशिक, कोकणात शेतीची पाहणी केली... शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे राज्यपालांनाही भेटले... पण सत्तासंघर्षाच्या या तिढ्याच्या चर्चेत आदित्य ठाकरे कुठेच नाहीत.
विशेष म्हणजे २०१४ मध्ये युतीची चर्चा करण्यासाठी भाजपाचे प्रभारी ओमप्रकाश माथुरांबरोबर शिवसेनेनं आदित्य ठाकरेंना पाठवलं होतं. त्यावरुन भाजपा नेत्यांचं बिनसलंही होतं. पण आता ज्यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून समोर आणण्यात आलं... ते सत्तास्थापनेच्या या चर्चेत कुठेच नाहीत... 'बाबा म्हणतील ते', एवढंच म्हणत आदित्य ठाकरे शिवसेनेचे सध्या तरी पोस्टरबॉयच राहिलेत.