मोठी बातमी : PMC बँकेच्या तीन संचालकांना अटक

PMC बँकेच्या (पीएमसी) घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज आणखी तीन जणांना अटक केली आहे. 

Updated: Dec 3, 2019, 11:16 PM IST
मोठी बातमी : PMC बँकेच्या तीन संचालकांना अटक title=

मुंबई : PMC बँक अर्थात पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज आणखी तीन जणांना अटक केली आहे. हे तिघेही बँकेचे संचालक आहेत. संचालक जगदीश मुखे, संचालक आणि कर्ज व आगाऊ रक्कम समिती सदस्य  मुक्ती बावीसी आणि संचालक आणि वसुली समिती सदस्या तृप्ती बने अशी त्यांची नावे आहेत. त्यांना उद्या मुंबई न्यायालायात हजर केले जाणार आहे.

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर आरबीआयने खातेदारांना त्यांच्याच खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात निर्बंध घातले होते. अनेकांना मोठा धक्का बसला होता. खातेदारांना स्वत:चे पैसे मिळत नसल्यामुळे त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या बँके घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आलेली आहे.

दरम्यान, कालच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पीएमसी बँकेच्या सुमारे ७८ टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण ठेव काढण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती त्यांनी काल दिली. तसेच याआधी एकावेळी ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे, अशी माहिती लोकसभेत अर्थमंत्री सीतारामण यांनी दिली होती. 

तसेच, अचानक आरोग्य विषयक उद्भवलेली गंभीर स्थिती, लग्न समारंभ, शिक्षणातील अडचणी आदी प्रसंगी पीएमसी बँकेच्या खातेधारकांना खात्यातून रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची मुभा देण्यात आलेली आहे. या घोटाळ्याची चौकशी सुरुच आहे. भाजप नेते तारासिंग यांचा मुलालाही या घोटाळ्यात अटक झाली आहे.