मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. मुंबईसह अनेक जिल्ह्यात रूग्णसंख्येत वाढ झालीय. रूग्णवाढ अशीच होत राहिली तर राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध लागू शकतात अशी भीती व्यक्त होतीय. (maharashtra corona update increase in number of patients in many districts including mumbai in last few days)
कोरोनाचा धोका टळलाय असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्णसंख्येमध्ये वाढ झालीय. राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.59 टक्के असला तरी मुंबईमध्ये हा दर 3.16 टक्के इतका आहे. तर पुण्यात हाच दर 2.16 टक्के इतका आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार मुंबईत 12 ते 18 मे या कालावधीत 1002 नवीन रुग्णांची नोंद झालीय. तर, 19 ते 25 मे या कालावधीत 1531 नवीन रुग्ण मुंबईमध्ये आढळून आले आहेत.
पुण्यामध्ये याच कालावधीत 297 वरून नवीन रुग्णसंख्या 329 इतकी झालीय. ठाणे, रायगड, मुंबई, पालघर यांचा एकत्रित विचार केला तर 35.86 टक्के रुग्णवाढ दिसून येतीय.
वाढती रूग्णसंख्या लक्षात घेत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी जनतेला सावध राहण्याचा इशारा दिलाय. दुसरीकडे रूग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर कोरोनाचे नियम बदलावे लागतील असं सांगत उपमुख्यमंत्र्यांनीही अप्रत्यक्षपणे निर्बंधांचे संकेत दिलेय.
महत्वाचं म्हणजे कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यामुळे अद्यापही राज्यात 100 टक्के लसीकरण पूर्ण झालेलं नाही. 30 टक्के लोकांनी लस घेण्यात रस दाखवलेला नाही. कोरोनाचा आजवरचा अनुभव लक्षात घेता चौथ्या लाटेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अन्यथा तुम्हा आम्हाला पुन्हा निर्बंधांचा सामना करावा लागेल.