मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी 14 जून रोजी रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान चक्रीवादळग्रस्तांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. चौल, बोर्ली, मुरुड येथे मुख्यमंत्र्यांकडून वादळग्रस्तांना मदत साहित्य आणि अनुदान वाटप करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्या रायगड दौऱ्यावर, वादळग्रस्तांना मदतीचे वाटप करणारhttps://t.co/HOK58cBO5u#NisargaCyclone #raigad pic.twitter.com/IQzuI81mYN
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 13, 2020
रविवारी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री मांडवा जेट्टी येथे पोहचतील. त्यानंतर चौल येथे ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेणार आहेत. 11 वाजता चौल मधील घरं, पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान, सौर कंदील, इतर साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे.
त्यानंतर दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे बोर्ली आणि 12.30 वाजता मुरुड येथे पोहचतील. बोर्ली, मुरुड दोन्ही ठिकाणी नुकसानीची पाहणी करुन, मदत वाटप करण्यात येईल. त्यानंतर मुरुड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी 3 वाजता मांडवा जेट्टी येथून बोटीने ते मुंबईकडे रवाना होतील.
दरम्यान, रत्नागिरी जिल्हयात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक बुधवारी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहे. बुधवारी केंद्रीय पथकाकडून महाड, मंडणगड, आंबडवे, केळशी, आडे, पाजपंढारी, दापोली, मुरुड, कर्दे या भागात नुकसानीचा पाहाणी दौरा करणार येणार आहे.