मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली 'ही' मागणी

कोरोनाचा उद्रेक होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

Updated: Mar 18, 2021, 07:22 AM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली 'ही' मागणी title=
Picture credit: Reuters

मुंबई : कोरोनाचा उद्रेक होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ४५ वर्षांवरील सर्वांचे सरसकट लसीकरण (Covid-19 vaccination) करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांच्याकडे केली. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी द्यावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रासह (Maharashtra) काही राज्यांत पुन्हा करोनाचे रुग्ण वाढल्यामुळे पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली. (Maharashtra CM Uddhav Thackeray to Centre: Give Covid vaccine everyone over 45)

कोरोना लाट रोखण्यासाठी अतिशय कठोर पावले उचलण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे व मुख्यमंत्री सचिवालयातील, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ४५ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाची मागणी उद्धव ठाकरे यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली.

राज्यातील कोरोनाची साथ रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात दररोज तीन लाख जणांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी ज्या केंद्रांची तयारी आणि क्षमता आहे अशा केंद्रांना किंवा रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी मिळावी. लसीकरणासाठी राज्यात अनेक खासगी रुग्णालयांनी नोंदणी केली आहे. पण त्यापैकी किती जणांची प्रत्यक्ष तयारी आहे हे तपासून लसीकरण वाढविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

केंद्रीय पथकांनी वेळोवेळी दिलेले सल्ले आणि मार्गदर्शनाप्रमाणे राज्य कोरोनाची लढाई लढत आहे. आता काही जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या खूप वेगाने वाढते आहे. महाराष्ट्र किंवा देशाच्या पश्चिम भागातील राज्यांत अचानक झालेली ही मोठी वाढ संभ्रमात टाकणारी आहे. याविषयी तज्ज्ञ, संशोधक यांनी प्रकाश टाकावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली. त्यावर जगातल्या कानाकोपऱ्यातील सर्वच देशांत वैज्ञानिक यासंदर्भात बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या बदलाचा अभ्यास करीत आहेत, असे उत्तर मोदी यांनी दिले.