मुंबई : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी (Jyotirlinga) एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर (Bhimashankar). शंकराची उपसाना आणि दर्शन घेण्यासाठी हजारो शीवभक्त (Shiva Bhakta) या ठिकाणी येत असतात. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी (Bhima River) उगम पावते. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढलं गेलंय. पण भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम सरकारने (Asam Government) प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारने म्हटलं आहे.
आसाम सरकारची वादग्रस्त जाहीरात
आसाम सरकारने एक जाहीरात प्रसिद्ध केली आहे. 6वं ज्योतिर्लिंग आसाममध्ये आहे अशी जाहिरात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी केलीय. या जाहीरातीवरुन (Advertise) आता नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आसाम सरकारची ही जाहीरात ट्विट केली असून शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadanvis Government) याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केलीय.
केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे.आता भाजपच्या आसाम सरकारचा दावा आहे की भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. शिंदे फडणवीस सरकारने तात्काळ भूमिका स्पष्ट करुन आसाममधील भाजप सरकारच्या या निंदनीय कृतीचा निषेध केला पाहिजे. भाजपाने केवळ महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्याच नव्हे तर तमाम भारतीयांच्या श्रद्धा, भावना दुखावल्या आहेत. भाजपाचा महाराष्ट्राबद्दलचा आकस सातत्याने दिसून येत आहे असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
1/2 Leave aside industries BJP wants to snatch away even Bhagwan Shiv from Maharashtra. Now BJP Assam govt claims that the sixth Jyotirlinga of Bhimashankar is situated in Assam & not in Maharashtra's Pune district. We strongly condemn this highly preposterous claim. pic.twitter.com/hiSUCTUYRK
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 14, 2023
अमोल कोल्हे यांचीही टीका
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही यावर जोरदार टीका केली आहे. हे मूळ हेमाडपंथी असणारं हे मंदिर गेली कित्येक शतकं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून गणलं गेलेलं आहे. आता ज्या शिवपुरानाचा आसामचे मुख्यमंत्री उल्लेख करतात, त्या शिवपुरानातही भीमाशंकरचं मंदिर हे भीमा नदीच्या उगमस्थानाजवळ असल्याचं म्हटलं आहे. भीमा नदी आसाममधल्या कुठल्याही डाकीनी हिलवर नाही. ही नदी महाराष्ट्रात आहे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. माझी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्र्यांना विनंती आहे की आसाम मुख्यमंत्र्यांच्या भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या विधानावर वेळीच हस्तक्षेप करावा आणि जे सत्य आहे ते त्यांच्यापर्यंतही पोहोचवावं असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय.