बॅनर, टी-शर्ट, लाखांची गर्दी... मविआची जोरदार तयारी, महामोर्चा ऐतिहासिक ठरणार?

महाविकास आघाडी हल्लाबोल मार्चाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सज्ज, मोर्चासाठी पोलीसही सज्ज, अडीच हजार पोलीस तैनात ड्रोन कॅमेरातून नजर

Updated: Dec 16, 2022, 07:43 PM IST
बॅनर, टी-शर्ट, लाखांची गर्दी... मविआची जोरदार तयारी, महामोर्चा ऐतिहासिक ठरणार? title=

Mahavikas Aghadi Morcha : महापुरूषांच्या अवमानाप्रकरणी उद्या महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) हल्लाबोल मोर्चाचं (Hallabol Morcha) आयोजन केलंय. या मोर्चात शिवसेना ठाकरे गट (Thackeray Group), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. या मोर्चासाठी मविआने जोरदार तयारी केली आहे. मोर्चासाठी 1 लाखापेक्षा जास्त कार्यकर्ते जमवण्याचा प्रयत्न असून या माध्यमातून मविआ शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. 

असा असेल मोर्चाचा मार्ग
भायखळा एटीएस कार्यालय समोर मोर्चासाठी उद्या सकाळी 10 वाजता कार्यकर्ते जमण्यास सुरूवात होणार आहे. मविआचे प्रमुख नेते 12 वाजेच्या सुमारास मोर्चाला येतील आणि जे जे फ्लायओव्हर वरून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलजवळ येऊन थांबेल. समाजवादी पक्षाचे (SP) मुस्लीम कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोर्चाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मोर्चाला जास्तीत जास्त लोकांची गर्दी व्हावी यासाठी मुंबईभर बॅनर्सही लावण्यात आले आहेत. तसंच या 'हल्लाबोल' असे लिहिलेले टीशर्टही छापण्यात आले आहेत. मविआतर्फे स्वयंसेवकही तैनात करण्यात येणार आहेत. 

मोर्चासाठी कडक पोलीस बंदोबस्त
महाविकास आघाडीच्या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी अडीच हजार पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये 2 अतिरिक्त आयुक्त, 5 DCP यांचा समावेश आहे. या रॅलीदरम्यान सीआरपीएफची तुकडीही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. गर्दी खूप वाढली तर मुंबई पोलिस ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे वेळोवेळी ड्रोनचा वापर करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

मोर्चाला गृहमंत्र्यांची परवानगी
महाविकास आघाडीने पुकारलेल्या महामोर्चाला पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती  उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिलीय. महाविकास आघाडीचा मोर्चा शांततेत व्हावा, लोकशाही मार्गाने विरोध करावा असं फडणवीस म्हणाले. कायदा सुव्यवस्था नीट राखली पाहिजे एवढ्यापुरताच सरकारचा हस्तक्षेप असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. 

हे ही वाचा : राज ठाकरे म्हणतात फाडून ठेवणार, कधी आणि कुणाची... वाचा

भाजपचं माफी मांगो आंदोलन 
एकीकडे महाविकास आघाडीने उद्या महामोर्चाचं रणशिंग फुंकलं असताना भाजपने माफी मांगो आंदोलनातून त्याला प्रत्युत्तर देण्याची रणनीती आखलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महाविकास आघाडी सातत्याने महापुरूषांचा अपमान करत आहे असा आरोप करत भाजप उद्या मुंबईभर माफी मांगो आंदोलन करणार आहे. उद्या मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघात भाजप आक्रमकरित्या माफी मांगो निदर्शनं करणार आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांनी माफी मागावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.