किरीट की स्पिरिट, सोमय्यांवर 'मातोश्री'च्या दारावर जाण्याची वेळ

उमेदवारीतला अडसर दूर करण्यासाठी किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी धडपड सुरू

Updated: Mar 29, 2019, 10:27 AM IST
किरीट की स्पिरिट, सोमय्यांवर 'मातोश्री'च्या दारावर जाण्याची वेळ  title=

कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई : गेली चार वर्ष शिवसेनेवर तुटून पडलेल्या किरीट सोमय्यांच्या उमेदवारीचं अवघड होऊन बसलंय. भाजपाचे खासदार असतानाही उमेदवारीसाठी किरीट सोमय्यांना शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतायत. शिवसेना मात्र किरीट सोमय्या विरोधावर ठाम आहे. किरीट सोमय्या भाजपाचे खासदार असले तरी त्यांच्या उमेदवारीचं भवितव्य मात्र शिवसेनेच्या हातात आहे. त्यामुळेच एकेकेकाळी मातोश्रीला अंगावर घेणाऱ्या सोमय्यांवर आता मातोश्रीच्या दारावर जाण्याची नामुष्की ओढवलीय. मात्र त्यांना मातोश्रीचे दरवाजे बंद झाले आहेत.

उमेदवारीतला अडसर दूर करण्यासाठी किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी धडपड सुरू केली. उद्धव ठाकरेंनी भेट नाकारल्यानंतर किरीट सोमय्यांनी प्रसाद लाड यांना मातोश्रीवर पाठवून उद्धव ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडं भाजपा नेते मात्र किरीट सोमय्यांच्या उमेदवारीवर ठामपणे बोलायला तयार नाहीत.

काय होते किरीट सोमय्यांचे आरोप?

काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना तर 'माफिया' संबोधत, मुंबईतील बिले काढण्यासाठी टक्केवारी दिल्याशिवाय ठेकेदारांना बिले मिळत नाहीत, असा गंभीर आरोप शिवसेनेवर केला होता. तसंच 'छगन भुजबळांनी ज्या कंपन्यांमधून मनी लाँडरिंग केलं त्याच कंपन्यांमधून उद्धव ठाकरेंनीही मनी लाँडरिंग केलं होतं' असा आरोपही सोमय्या यांनी शिवसेना पक्षाप्रमुखांवर केला होता.

भाजपकडून सोमय्यांचा वापर?

भाजपाकडून ठोस आग्रह होत नसल्यानं शिवसेनेच्या सोमय्या विरोधाला आणखी धार आलीय. किरीट सोमय्यांना उमेदवारी जाहीर झाल्यास शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचा भाऊ आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. 

जेव्हा गरज होती तेव्हा शिवसेने विरोधात किरीट सोमय्यांचा भाजपाने वापर केला. आता मात्र किरीट सोमय्यांच्या पाठिशी भाजपा उभं राहताना दिसत नाही. टोकाच्या शिवसेना विरोधामुळे किरीट सोमय्यांची राजकीय कारकिर्दच आता संकटात सापडल्याचं चित्र आहे.