Loksabha 2024 : गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी (PM Narendra Modi) महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यानंतर आता शुक्रवारी म्हणजे 15 मे रोजी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहेत. निमित्त आहे शिवाजी पार्कवर होणाऱ्या महायुतीच्या प्रचाराच्या सांगता सभेचं. महाराष्ट्रात पाचव्या आणि अंतिम टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात येत्या 20 मे रोजी मतदान (Loksabha 5th Phase Voting) होणार आहे. यासाठीच्या प्रचाराची सांगता शनिवारी होईल. याआधी पूर्वसंध्येला मुंबईतल्या शिवाजी पार्कवर (Shivaji Park) पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरेंचंही भाषण या सभेत होणाराय. त्यामुळे या सभेबाबतची उत्सूकता शिगेला पोहोचलीय..
महायुतीसाठी राज ठाकरेंच्या सभा
राज ठाकरेंनी आतापर्यंत महायुतीच्या उमेदवारांसाठी तीन प्रचारसभा घेतल्या. कणकवलीत नारायण राणेंसाठी, पुण्यात मुरलीधर मोहोळांसाठी तर कळव्यात श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंसाठी राज ठाकरेंनी प्रचार केला. आता शिवाजी पार्कवरची त्यांची ही चौथी सभा असणाराय. अलिकडेच एका मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी राज ठाकरेंचं कौतुक केलं होतं.
मोदींकडून राज ठाकरेंचं कौतुक
राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत. त्यांनी यापूर्वी आम्हाला पाठिंबा दिलाय. महाराष्ट्राच्या विकासातही ते हातभार लावू शकतील असे आम्हाला वाटते. त्यांचं सोबत येणं केवळ सत्तेसाठी किंवा राजकीय गणितांसाठी नाही. लोकसेवेसाठी एकत्र येणे, हा त्यामागचा उद्देश आहे, असं मोदी म्हणाले होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं एकही उमेदवार उभा केलेला नाही. मात्र मुंबई-ठाणे-नाशिकमध्ये मनसेची चांगली ताकद आहे. त्यामुळं शिवाजी पार्कच्या सभेत पंतप्रधान मोदींच्या भाषणाइतकीच राज ठाकरे काय बोलणार, याचीही उत्सूकता आहे.
मुंबईतील महायुतीचे उमेदवार
मुंबईतल्या महायुतीच्या सहा उमेदवारांसाठी पीएम मोदी आणि राज ठाकरेंची सभा होणार आहे. मुंबईत महायुतीनं 6 पैकी 4 जागांवर मराठी, तर 2 जागांवर अमराठी उमेदवार दिलेत. उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि उत्तर पूर्व मुंबईतून मिहीर कोटेचा असे भाजपचे 2 उमेदवार अमराठी आहेत. उत्तर मध्य मुंबईतून भाजपनं अॅड. उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवलंय. शिवसेना शिंदे गटानं दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव, दक्षिण मध्य मुंबईतून विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर या मराठी उमेदवारांना तिकीटं दिलीत.